बंद घाटमार्गामुळे प्रवाशांना फटका

बंद घाटमार्गामुळे प्रवाशांना फटका

Published on

बंद घाटमार्गामुळे प्रवाशांना फटका
विद्यार्थी, व्यावसायिक मेटाकुटीला

महाड, ता. २५ (बातमीदार) : धोकादायक व सुरक्षेच्या नावाखाली महाड, पुणे व पंढरपूर मार्गावरील वरंध घाटमार्ग पावसाळ्यात बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावरील एसटी बस ताम्‍हिणीमार्गे वळवण्यात आल्‍याने शालेय विद्यार्थी, स्थानिक व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात धोकादायक घाट व रुंदीकरणाच्या कामामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी वरंध घाट पुणे हद्दीपर्यंत बंद केला. त्यानंतर महाड हद्दीमध्ये रुंदीकरण पूर्ण झालेला असतानाही आणि वाहतुकीसाठी घाटमार्ग सुस्थितीत असतानाही, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांनीही रायगड हद्दीतील घाटमार्ग बंद केला आहे.
वरंध घाटमार्ग धोकादायक झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या महाड, दापोली, खेड, रत्नागिरी आगारांतील बसची वाहतूक चार वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. एसटीच्या सर्व गाड्या आता ताम्‍हिणीमार्गे जातात. त्‍यामुळे या मार्गावरील एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. बस महाबळेश्वर तसेच ताम्‍हिणीमार्गे वळवण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, शिवाय प्रवासाचा वेळही वाढत आहे. घाट सीमारेषेवर असलेल्या अनेक गावांमधील विद्यार्थी वरंध येथे शिक्षणासाठी येतात, मात्र बस बंद असल्‍याने त्‍यांना खासगी वाहनांचा आधार घ्‍यावा लागतो.

घाटरस्त्याचे महत्त्व
कोकणाला पश्चिम घाटाशी जोडणारा वरंध घाटमार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. वरंध घाटातून महाडमार्गे पुणे तसेच फलटण, पंढरपूर अशी वाहतूक होते. महाड परिसरात व्यापारासाठी, भाजी, दूध तसेच किराणामाल अशा जीवनावश्‍यक वस्तू, एमआयडीसीत मालवाहतूक करण्यासाठी हा घाट महत्त्वाचा मानला जातो. मर्यादित वाहतूक व कमी वाहतूक कोंडीमुळे त्‍याचा अधिक वापर होतो. मात्र सध्या घाटमार्ग बंद असल्‍याने व्यापारी, कामगारवर्गाला मोठा फटका बसतो आहे.

दरड, रस्‍ता खचण्याचा धोका
२०१४ पासून पावसाळ्यामध्ये दरवर्षी दरड कोसळणे, संरक्षण भिंती तसेच रस्ता खचणे असे प्रकार घडत आहेत. २०१९ व २०२० मध्ये घाटमार्ग तब्बल आठ महिने बंद होता. २०२१ मध्ये पावसाळ्यात घाटातील रस्ता खचल्याने व संरक्षण भिंत पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे हा भाग वाहतुकीला बंद करण्यात येतो.

पर्यटनांचा हिरमोड
पावसाळ्यात वरंध घाटातील वातावरण अतिशय नयनरम्य असते. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. घाटातून जाणारे पर्यटक वाघजाई मंदिर अथवा वरंध या गावांमध्ये थांबतात. याशिवाय वरंध घाटातून शिवथरघळ येथेही मोठ्या प्रमाणात वर्षा सहली येतात. घाटमार्गालगत अनेक लहान-मोठे व्यावसायिक चहा, वडापाव, मका कणीस तसेच इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करतात, परंतु हा घाटमार्ग वाहतुकीला बंद केल्‍याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये हमखास होणाऱ्या व्यवसायालाही मोठा फटका बसतो आहे. १ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत हा घाट बंद राहणार असल्याने विक्रेत्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रुंदीकरणासाठी १२० कोटी खर्च
महाड-पंढरपूर-पुणे मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर वरंध घाटातील रस्त्यासाठी महाड हद्दीमध्ये सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण करण्यात आले. तसेच पुणे हद्दीतही रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च येत असून, एवढा खर्च करूनही रस्ता वाहतुकीला बंद असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

इतर घाटांमध्ये दरडी कोसळल्या तरी ते वाहतुकीसाठी सुरू असतात, परंतु दरवर्षी वरंध घाट बंद केला जातो, हे योग्य नाही. सीमेवरील विद्यार्थ्यांची शाळा, ग्रामस्थांची बाजारपेठ व आरोग्यसेवा वरंध येथे आहे. घाट व वाहतूक बंद झाल्याने सर्वांना त्रास सहन करावा लागतो. रस्त्याला महामार्गाचा दर्जा दिल्यानंतर घाट बंद ठेवणे चुकीचे वाटते.
- सुभाष मालुसरे, माजी सरपंच, पारमाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com