‘मेरी पंचायत’ ॲपवर मिळणार गावाची कुंडली
महाड, ता. २५ (बातमीदार) : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रामपंचायतींच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायत राज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत ‘मेरी पंचायत’ हे ॲप आणले आहे. या ॲपमुळे गावाच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.
डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत. हे ‘मेरी पंचायत’ ॲपने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागला असून केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरीत्या पूर्ण करू शकत आहे. सरकारकडून गावासाठी किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती ॲपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल. ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत. केवळ माहितीच नाही तर ॲपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखादेखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.
ग्रामपंचायतमधील सदस्य संख्या, समित्यांची माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम याशिवाय कामाची सद्यस्थिती वेगवेगळी देयके, पाण्याचे स्रोत, नळजोडणी, पाणी तपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला ॲपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे.
अभिप्राय देण्याची सुविधा
ग्रामपंचायतीमध्ये जी कामे सुरू आहेत अथवा ज्या काही योजना आहेत त्यामध्ये त्रुटी असल्यास किंवा कामाचे कौतुक करावयाचे असल्यास त्याबाबतचे फोटोही अपलोड करता येणार आहेत. ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ २५० शब्दांमध्ये आपला चांगला किंवा वाईट अभिप्राय यावर देऊ शकतील. त्यामुळे प्रशासनालादेखील गावामध्ये काय सुरू आहे, याची माहिती मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

