खलाटीत घुमताहेत पारंपरिक सूर

खलाटीत घुमताहेत पारंपरिक सूर

Published on

खलाटीत घुमताहेत पारंपरिक सूर
भातलावणीची समाजमाध्यमांवर क्रेझ; रील्‍स, फोटोसेशनमध्ये पर्यटकांसह सेलिब्रिटींचा सहभाग

सुनील पाटकर, महाड
रायगड जिल्ह्यातील खलाटीत आता भातलावणीची लगबग सुरू झाली असून शेतातून भलरीची गाणी कानावर पडत आहेत. पूर्वी शेती, गावापुरती मर्यादित असलेली ही लावणी आता समाजमाध्यमांमुळे सर्वदूर पोहोचत आहे. बदलत्या समाजजीवनाचा परिणाम सर्व स्तरात होत असतानाच शेती आणि भातलावणीही त्यातून सुटलेली नाही. भातलावणीची क्रेझ, रील्स आणि फोटोसेशन करीत नवी पिढी शेतातील पारंपरिक गाणी समाजमाध्यमांवर व्हायरल करीत आहेत. पर्यटक आणि सेलिब्रिटीही यात सहभागी होत असल्‍याने भातलावणी सध्या ग्लोबल ट्रेंडिगचा विषय झाला आहे.
कोकणातील ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. शेतीत महत्त्वाची आणि कष्टाची कामे म्हणजे लावणी. यासाठी मोठे मनुष्यबळ, कष्ट लागतात. भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. ५००-७०० रुपये दिवसाची मजुरी असते. याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास एक- दोन हजार रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास, किमान १५ माणसे व चार नांगरांची गरज असते. पूर्वी खेडेगावात वर्दळ असायची, एकमेकांच्या मदतीला धावणारे सहकारी असल्याने आणि व्यवहार पाहिला जात नव्हता. सहजतेने शेतमजूरही मिळायचे, यामुळे शेतीची कामे झपाट्याने पूर्ण व्हायची. गाववाड्या, गावकरी एकमेकांकडे लावणीच्या कामाला जायची. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात, त्यामुळे सहकाराच्या भावनेतून भातलावणीचा निपटारा होत असे.
शेतीच्या हंगामात भातलावणी हा उत्साहाचा हंगाम असल्‍याने पारंपरिक गाण्याचे सूर उमटत. इरले डोक्‍यावर घेतलेले, घोंगड्या अंगावर घेतलेले अनेक शेतकरी शेतात लावणीत मग्न असायचे. रात्री पेट्रोमॅक्‍सच्या उजेडात भातलावणी होत असल्याच्या आठवणीही वृद्ध शेतकरी सांगतात. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. इरले-घोंगड्यांची जागा प्लॅस्टिक व रेनकोटने घेतली आहे. सहकाराच्या भावनेतही व्यवहार बघितला जात आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरविलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. असे असले तरी भातलावणी आताही आता दूरवर पसरत आहे. कोकणातील अनेक तरुण आपल्या शहरी मित्रांसोबत खास भातलावणीसाठी गावात दाखल होत आहे. इतकेच नव्हे तर माझ्या गावातील भातलावणी म्हणून समाजमाध्यमांवर व्हिडिओ, फोटो अपलोड करीत आहेत. यूट्युबरही भातलावणीचे खास व्हिडिओ बनवत असून त्याला प्रतिसादही मिळत आहे.
जुन्या पिढीतील वयोवृद्धांच्या मुखातील भलरी गाण्यात नव्या पिढीचे सूर मिसळत आहे. कोकणातील काही राजकीय नेते, मंत्रीही शेतकरी म्हणून आपण भातलावणी करीत असल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करीत आहेत. भातलावणीचे अनुभव कथन करणारे लेख आणि फोटो, रील्‍स सध्या समाजमाध्यमांवर फिरू लागल्‍याचे दिसून येत आहे.

नांगरणी स्‍पर्धांचे आयोजन
निसर्गाच्या सान्निध्यात वावरता यावे, चिखलात घाम गाळावा, अशी इच्छा असणारे आता लावणीसाठी गावात येत आहेत. भातलावणी शिबिर असा नवा ट्रेंडदेखील तयार होत आहे. भातलावणीची शिबिरेही काही ठिकाणी लोकप्रिय होत आहेत. भातलावणीच्या सहली पर्यटकांसाठी आयोजित केल्या जात असून शिवारात बांधावर पर्यटकांना जेवणाचा आनंद दिला जात आहे. विशेष म्हणजे, उपक्रमाला शहरी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. लहान मुलांना पारंपरिक शेतीची पद्धत कळावी व मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा शेतात प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी अनेक शाळा व संस्था पुढाकार घेत मुलांना थेट भातलावणी शिकवत आहेत. विविध स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयीन मुलांनासह भातलावणीत सहभाग वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर भातलावणी आणि नांगरणी स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामुळे भातलावणी आता शिवारापुरती मर्यादित राहिलेली नाही.
......

महाड ः भातलावणी जोरात
शहरी पर्यटकही गावात

Marathi News Esakal
www.esakal.com