रायगडावरील शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था, संवर्धन करण्याची गरज
शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था
रायगडावरील संवर्धनात ऐतिहासिक ठेवा जतनाची गरज
महाड, ता. १३ (बातमीदार) ः रायगड किल्ल्यावरील दगडी बांधकाम असलेले शिवकालीन पर्जन्यमापक यंत्र काळाच्या ओघात ढासळू लागले आहे. दुरवस्था झालेले गडावरील हे पर्जन्यमापक यंत्र रायगड संवर्धनात पुन्हा उभे केले जावे, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये रायगड किल्ल्याचा समावेश झाल्याने शिवप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या असून, रायगडावरील अनेक वास्तू प्रकाशझोतात येण्यास मदत होणार आहे. आज आधुनिक पद्धतीची यंत्रणा वापरून पर्जन्यमापन केले जाते आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. परंतु शिवकाळात आणि त्यापूर्वीदेखील पारंपरिक पद्धतीने पर्जन्यमापन केले जात असल्याचे इतिहासातून समोर आले आहे. किल्ले रायगडावरदेखील अशा प्रकारे शिवकालीन पर्जन्यमापक अस्तित्वात आहे, परंतु त्याची दुरवस्था होत आहे.
किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. हे पर्जन्यमापक दगडी बांधकामातील असून, याच्या तीन बाजू भिंतीच्या आहेत, तर एका बाजूने पाण्याचा मार्ग दिसून येतो. वरील बाजूस तीन छिद्रे ठेवण्यात आली आहेत. छिद्रातूनच पावसाचे पाणी आत जाऊन पारंपरिक पद्धतीने पावसाचे मोजमाप केले जात होते. या पर्जन्यमापकाची सध्या दुरवस्था झाली आहे. नव्या अभ्यासातून हे पर्जन्यमापक असल्याचे समोर आले आहे.
शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक यंत्र रायगडावर बसविण्यात आले असावे, असा अंदाज बांधला जातोय. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक गोपाळ चांदोरकर यांच्या ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या ‘वैभव रायगडचे’ या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे, तर ‘श्रीमत् रायगिरौ’ या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे.
पीकपाण्याच्या नियोजनासाठी पर्जन्यमापक
छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर पाणी नियोजन उत्तम केले होते. गडावर गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त तलाव आणि इतर अनेक बंधारे बांधले होते. आता रायगड संवर्धनाच्या माध्यमातून या तलावांचे योग्य प्रकारे संवर्धन केले जात आहे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो, हे पर्जन्यमापकामुळे समजून येते आणि रायगडावर किती तलाव लागतील, त्यांची खोली किती ठेवायची, पाणी किती पुरेल याचा अंदाज घेतला जात होता. त्या काळातदेखील शेती हे उदरनिर्वाह करण्याचे साधन होते. राज्याचा कोषदेखील शेती उत्पन्नावर अवलंबून होता. त्यामुळे पीकपाण्याचे नियोजन या पर्जन्यमापक यंत्रणेच्या माध्यमातून केले जात होते. याकरिता हे पर्जन्यमापक बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. दुरवस्था झालेल्या या पर्जन्यमापक यंत्राचे संवर्धन करून वास्तू जतन केली जावी, अशी पर्यटक व शिवप्रेमींची मागणी आहे.
किल्ले रायगड हे जागतिक वारसास्थळ झाले हे निश्चितच अभिमानास्पद आहे, परंतु छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य वैचारिक वारसा जतन करणे हे प्रत्येक शिवप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे. कोकणातील गिरिदुर्ग, जलदुर्ग जल संपन्न करण्यासाठी महाराजांनी वापरलेली जलनीती आज आचरणात आणणे गरजेचे आहे. ही वास्तू जलमापक आहे की अन्य काही यावर खल होत राहतील, पण ही वास्तू जतन करून हा देदीप्यमान वारसा जपणे गरजेचे आहे.
- गणेश श्रीराम खातू, शिव जलनीती अभ्यासक तथा सचिव,
श्री राजेद्र सामाजिक विकास संस्था, नाते
महाड - रायगडावरील पर्जन्यमापक यंत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.