आरोग्य केंद्रनिहाय वैद्यकीय पथकांची स्थापना
महाड, ता. १६ (बातमीदार) : नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने आरोग्यसेवा मिळावी तसेच पावसाळ्यातील साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महाडमध्ये आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत आरोग्य विभागाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली असून, साथीचे आजार पसरू नयेत याची खबरदारीही घेतली जात आहे. महाड तालुका आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडे आवश्यक जबाबदारी देण्यात आली आहे.
महाड तालुका दुर्गम व डोंगराळ तालुका असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात अनेक नैसर्गिक आपत्ती घडत असतात. तसेच पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरसीस, गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, विषमज्वर, डेंगी, मलेरिया, सर्दी-ताप अशा आजारांची साथ होण्याचीदेखील शक्यता असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
महाड तालुक्यामध्ये वरंध, बिरवाडी, दासगाव ,पाचाड, चिंभावे व विन्हेरे अशी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयदेखील आहे. तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा व कर्मचारीदेखील उपलब्ध आहेत. महाड तालुका आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकांकडे आवश्यक ती जबाबदारी देण्यात आली आहे. साथरोग निर्माण आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संभाव्य साथीचे आजार तसेच आपत्ती काळामध्ये लागणारे वैद्यकीय सहाय्य गृहीत धरून साथ नियंत्रण किट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. पावसाळ्यात अनेक आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असणारे पिण्याच्या पाण्याचे स्रोत येथील पाणी टीसीएल पावडर टाकून शुद्ध करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
पाण्याच्या नमुन्यांची तपासणी
ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी पाठवले जात आहेत. अयोग्य नमुने पिण्यासाठी योग्य करण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याची जास्त साठवणूक करू नये. तसेच पाणी साठवलेली भांडी काही दिवसाआड स्वच्छ केली जावीत, अशा सूचनाही आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती तसेच साथीचे व पावसाळ्यात निर्माण होणारे आजार याबाबत आरोग्य विभाग सतर्क आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारांकरिता साथ नियंत्रण किट तयार ठेण्यात आले आहेत.
- डॉ. नितीन बावडेकर, आरोग्य अधिकारी, महाड
महाड ः विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय पथक तैनात आहे.
डॉ. नितीन बावडेकर