पशुवैद्यकीय अधिकार्यावर १० दवाखान्याचा कारभार
महाड, ता. २२ ( बातमीदार) : महाड व पोलादपूर तालुक्यातील १० पशुवैद्यकीय दवाखान्यांची आणि सुमारे एक लाख पशुधनाची जबाबदारी केवळ एकच पशुधन विकास अधिकारी सांभाळत आहे. गेल्या अनेक वर्षांत पशुधन अधिकाऱ्यांची भरती न झाल्याने तालुक्यातील पशुधनाचा कारभार सांभाळताना या एका अधिकाऱ्याची मोठी दमछाक होत आहे, शिवाय पशुधन विभागाच्या कारभारावरही याचा परिणाम होत आहे.
महाड तालुक्यामध्ये ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे आजही मोठ्या संख्येने पशुधन आहे. तालुक्यामध्ये अनेक गवळवाडी असल्याने दुग्ध व्यवसायाला चालना मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक-दोन जनावरे असल्याने ग्रामीण भागामध्ये पशुधनाला आरोग्य सुविधा देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
महाड तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले नाते, वाळसुरे, चांढवे, तुडील, तेलंगे, दासगाव, वरंध आणि महाड शहरांमधील नवे नगर भागात असणारे मुख्य दवाखाना असे एकूण आठ दवाखाने, तर पोलादपूर तालुक्यातील आड व लोहारे या गावातील दोन दवाखाने असे एकूण १० दवाखान्यांचा कारभार सांभाळण्यासाठी तसेच महाड शहरातील पशुधन आयुक्त दवाखान्याचा कारभार सांभाळण्यासाठी सद्यःस्थितीमध्ये केवळ एकच पशुधन विकास अधिकारी आहे. त्यांच्यावर महाड तालुक्यातील ८९ गावे व पोलादपूरमधील सुमारे १४ गावांतील पशुधनाची देखभाल आरोग्य समस्या लसीकरण व इतर पशुधन योजना आदींची जबाबदारी आहे. नवीन पद भरतीअभावी या दवाखान्यांतील पशुधन अधिकारीपद रिक्त आहे.
सध्या महाडमध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. धनंजय दुबल हे काम पाहात असून, त्यांच्यासोबत आणखी एक महिला डॉक्टर नेमण्यात आली होती, परंतु ही महिला पशुचिकित्सक सध्या रजेवर असल्याने दोन तालुक्यांची संपूर्ण जबाबदारी डॉ. दुबल यांना एकट्याला सांभाळावी लागत आहे. त्यातच त्यांच्याकडे महाडच्या पशुधन सहाय्यक आयुक्ताचा व माणगाव येथील अतिरिक्त पदभारदेखील आहे. पशुधनावर अनेकवेळा वेगवेगळ्या संसर्गाची लागण होत असते. यासाठी त्यांना लसीकरण करावे लागते तसेच बिबट्या व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पशुधनाचा मृत्यू होतो. अशावेळी त्यांचे शवविच्छेदन करणे आवश्यक असते. याशिवाय सरकारच्या अनेक पशुधनविषयक योजना राबवण्याचे महत्त्वाचे कामदेखील या विभागाला करावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे, परंतु सध्या तालुक्यातील पशुधन विभागाचा गाडा केवळ एकच अधिकारी हाकताना दिसतो. पशुधन अधिकाऱ्यांची भरती थेट मंत्रालयातून होत असल्याने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
महाड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. ग्रामीण भागात जनावरांचे आरोग्य बिघडल्यास त्यांना तातडीने सुविधा मिळणे आवश्यक आहे. याकरिता सरकारने तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व पदे भरावीत.
- टी. एस. देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना
पशुधनाची आकडेवारी
गायी - २५,५२९
म्हैस - ६,५१९
शेळ्या - ५,०९३
कोंबड्या - ६२,६७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.