कारखान्यांतून नशेखोरीचा बाजार
महाड, ता. ४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामध्ये गांजा, चरस अशा नशेसाठीच्या पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महाडसारख्या औद्योगिक क्षेत्राचा वापर केला जात असून, पोलिसांच्या कारवाईतून हा प्रकार समोर आला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रामधील रोहन केमिकल या कारखान्यामध्ये २४ जुलैला अमली पदार्थ नियंत्रण विभाग व पोलिस यंत्रणेने मारलेल्या छाप्यामध्ये तब्बल ९० कोटींचा केटामाईनसाठा जप्त केला होता. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांवर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमली पदार्थ तयार करण्याचा हा इतिहास औद्योगिक क्षेत्रांमध्ये जुना आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात २०१० मध्ये रायरेश्वर केमिकल कारखान्यावर छापा टाकण्यात आला होता. त्या वेळी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच महाड औद्योगिक क्षेत्र रडारवर आले.
------------------------------------
३०० कोटींचा मुद्देमाल जप्त
रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण पसरल्याने अनेक कारखाने बंद पडले आहेत. कारखान्यांच्या आडून अमली पदार्थ निर्मितीचे मोठे षडयंत्र असल्याचे विविध छाप्यातून स्पष्ट झाले आहे. बंद कंपन्यांमध्ये पाणीपुरवठा बंद असल्याने याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही, परंतु टँकरने पाणी विकत आणून जुजबी कामगारांच्या मदतीने अशा प्रकारचे उत्पादन काढले जात असते. रायगड जिल्ह्यात वर्षभरात ३०० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
-------------------------------------
भावी पिढी संकटात
- अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने गांजा, चरस असे अमली पदार्थ आढळून आले. अलिबाग मुरूड परिसरात समुद्रकिनारी अशा अमली पदार्थांची पाकिटेदेखील सापडली आहेत, परंतु रासायनिक अमली पदार्थांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागला. आहे. मेफेड्रोन, केटामाइन, स्यूडो इफिड्रीन अशा प्रकारचे अमली पदार्थ उपयोगात देऊ लागले आहेत.
- म्याऊ म्याऊ, व्हाइट पावडर अशा सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थांमुळे भावी पिढी बरबाद होत आहे. या रासायनिक अमली पदार्थांच्या उत्पादनामध्ये औद्योगिक क्षेत्रांचा पुढाकार अनेक वेळा दिसला आहे. यामुळे एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न आणि औषध प्रशासन तसेच औद्योगिक क्षेत्राशी यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे.
-----------------------------------
कामगाराचा पहिला बळी
औषधांमध्ये वापर केला जात असलेल्या रसायनांचा तसेच बंदी करण्यात आलेल्या रसायनांचे बेकायदेशीर उत्पादन केले जाते. बेरोजगारीचे संकट असल्याने अनेक कामगारांना कंपनीमध्ये कोणते उत्पादन घेतले जाते, याची माहिती नसते, पण एनसीबीचा छापा पडतो तेव्हा मात्र हातावर पोट भरत असणाऱ्या कामगाराचा पहिला बळी जातो. अनेक कामगारांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असल्याने न्यायालयीन कारवाईसाठी मोठा खर्च करावा लागतो.
..... .....
कारवाईचा तपशील
२०१० - रायरेश्वर केमिकलवर छाप्यात दोघांना अटक.
२०१५ - रोहन केमिकलवरील छाप्यात दोघांना अटक.
२०१८ - एका औषध कंपनीत उत्पादन केले जाणारे उत्पादन कंपनीबाहेर काढून त्याची विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक.
२०२० - रांजणगाव येथे कार तपासणीत अमली पदार्थ आढळले होते. हे अमली पदार्थ महाड येथील दोन कारखान्यांत बनवले गेले होते. याप्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली.
२०२३ - खोपोली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात छापा. १०६ कोटींचे अमली पदार्थ जप्त.
२०२५ - बेकायदेशीर लॅबमध्ये २० कोटींचे अमली पदार्थ जप्त.
२०२५ - रोहन केमिकलमध्ये ९० कोटींचे अमली पदार्थ जप्त, चौघांना अटक.
......
अमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी धडक कारवाई सत्र सुरू करण्यात आले आहे. त्याला चांगले यश येत आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमध्ये काही बंद पडलेल्या कारखान्यांचा सहभाग उघड झालेला आहे. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सबंधित ग्रामपंचायतींना बंद पडलेल्या कारखान्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.