मंगळागौर व पारंपरिक नृत्य स्पर्धेत रणरागिणी ग्रुप प्रथम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रावण सरी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगळागौर व पारंपरिक नृत्य स्पर्धेत रणरागिणी ग्रुप प्रथम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रावण सरी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड, ता.६ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाड येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रावणसरी कार्यक्रमाला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंगळागौर व पारंपरिक नृत्य स्पर्धेत महाड शहरांमधील नवेनगर येथील रणरागिणी ग्रुप प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी (ता. ४) मंगळागौर व पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला स्नेहल जगताप यांच्यासमवेत अपेक्षा कारेकर, अपर्णा येरूणकर, संचिता निगुडकर, सुप्रिया देशमुख, लाजरी जाधव, सिद्धी धुमाळ, निधी गुरव, वैशाली रक्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी महिला वर्गाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. या स्पर्धेत १५ महिला गटांनी सहभाग नोंदवत आपली परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविले. या स्पर्धेदरम्यान विशेष नृत्य कलाविष्कार म्हणून लिटिल चॅम्प्स् ग्रुप, महाड मुक्तांगण दिव्यांग मुलांची शाळा यांनी नृत्य सादर करत उपस्थित महिलांची दाद मिळवली. सर्व मंडळांनी एकापेक्षा एक सरळ नृत्य व मंगळागौर सादर केल्या. यामधून आपले वर्चस्व सिद्ध करत नवेनगरमधील रणरागिणी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल जगताप व मान्यवरांच्या हस्ते १५ हजार रोख व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले.
डीसी ग्रुप दुसरा क्रमांक पटकावत १० हजार व सन्मानचिन्ह, तर तिसरा क्रमांक ओमकार ग्रुप, खरवली यांना सात हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून नथीचा नखरा ग्रुप, महाड व भरारी ग्रुपला प्रत्येकी पाच हजार व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कादंबरी प्रशांत वैद्य (खेड) आणि तेजस गणपत जाधव (दापोली) यांनी काम पाहिले.
फोटो -
विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविताना स्नेहल जगताप