विद्यार्थ्यांनी स्थापन केली चिल्ड्रन्स बँक

विद्यार्थ्यांनी स्थापन केली चिल्ड्रन्स बँक

Published on

विद्यार्थ्यांनी स्थापन केली चिल्ड्रन्स बँक
चांढवे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचा उपक्रम
महाड, ता. १० (बातमीदार) : विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचे उत्तम उदाहरण महाड तालुक्यातील चांढवे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेने इतर शाळांपुढे ठेवले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमातून एक चिल्ड्रन्स बँक स्थापन करून बँकेच्या कारभाराची व व्यवहाराची माहिती घेतली.
या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सध्याच्या युगातील आर्थिक गरजा, बँकिंग व्यवस्थेतील मूलभूत गोष्टी, जबाबदारी यासारख्या महत्त्वाच्या बाबींची जाणीव करून देणे, हा होता. हा एक विद्यार्थी-केंद्रित उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांनीदेखील याचा चांगला अनुभव घेतला. यामध्ये मुलांनी बँकिंगच्या विविध पायऱ्या केवळ समजून घेतल्या नाहीत, तर ते स्वतः करून त्यांचे कौशल्यदेखील दाखवले. यासाठी एक बँक मॉडेल स्वरूपात तयार करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन मोमीन, शिक्षक तय्यब शेख आणि शाळा समितीच्या अध्यक्षा मेराज दिलावर पानसारी आणि इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय पालकांच्या उत्साही सहभागाने मुलांचे मनोबल द्विगुणित झाले. कार्यक्रमाच्या समारोपासाठी केंद्रप्रमुख अखलाक गोडमे व केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राज अहमद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. हा उपक्रम मुलांसाठी केवळ व्यावहारिक प्रशिक्षणाचे साधन बनला नाही, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि निर्णयक्षमता यासारखे गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरला. या शाळेने केलेला हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणास पात्र ठरला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com