सुपांचे गाव म्हणून आकलेची ओळख

सुपांचे गाव म्हणून आकलेची ओळख

Published on

सुपांचे गाव म्हणून आकलेची ओळख
गणेशोत्सवात हजारोंची निर्मिती; बांबूच्या विणकामाची शेकडो वर्षांची परंपरा
महाड, ता. १९ ः सुपांचे गाव अशी ओळख असलेल्या महाड तालुक्यातील आकले गावामध्ये गौरी-गणपतीनिमित्त घरोघरी सुपे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. हजारो सुपे विक्रीसाठीही बाजारात रवाना झाली आहेत. शेकडो वर्षांची सुपे व बांबूच्या विणकामाची परंपरा यावर्षीही तितक्याच उत्साहाने गावात जोपासली जात आहे.
गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या पूजेसाठी तसेच ओवशासाठी पारंपरिक पद्धतीने विणलेल्या सुपांना वेगळे महत्त्व व मोठी मागणीही असते. भक्तांची ही मागणी पूर्ण करण्याचे काम महाड तालुक्यातील आकले गावातील विणकाम कारागीर शेकडो वर्षांपासून करीत आहेत. बारा बलुतेदारांमध्ये असलेल्या बुरूड समाजाचा बांबू विणकाम हा प्रमुख व्यवसाय आहे. महाड तालुक्यातील आकलेमध्ये हा पारंपरिक व्यवसाय जपला जात असून पारंपरिक सुपे तयार करण्यासाठी हे गाव ओळखले जाते. गावातील मुख्य अर्थकारण या बांबूपासून विणकाम केलेल्या सुपे आणि इतर वस्तूंभोवती फिरते. या गावातील सुमारे ३० कुटुंबांमध्ये हा व्यवसाय चालतो. गावातील अनेक घरांच्या पडवीमध्ये नाहीतर ओसरीवर बांबूचे कातरकाम करणारे, विणकाम करणारे कारागीर तर महिला गणेशोत्सवात सुपे विणण्याच्या कामामध्ये व्यग्र असलेल्या दिसत आहेत. येथील महिलांनी सरस्वती व राजमाता जिजाऊ, असे महिला बचत गट स्थापन करून त्यातून घरकाम सांभाळत बांबूच्या विणकामातून आपल्या कुटुंबालाही हातभार लावत आहेत. येथील सुपे रायगड जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी, मुंबई, पुणे, सातारा, सुरत व बडोदा या भागांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे ग्रामस्थ सुधाकर माने यांनी सांगितले.
................
प्‍लॅस्‍टिकच्या अतिक्रमणामुळे आव्हान
आकले गावातील बुरूड समाज सुपे, आसने, दुरडी, हारे, परडी, टोपल्या वर्षभर तयार करत असतात; परंतु गणेशोत्सवात हा व्यवसाय भरभराटीस येतो. गौरीसाठी ओवशाकरिता सुपांची फारच मोठी मागणी असते. आकले गावात वर्षभरात ७० ते ७५ हजार सुपे बनवली जातात. तर इतर विणकामाच्या लहान-मोठ्या वस्तू या गावांमध्ये तयार केल्या जातात. बांबूचे विणकाम करणाऱ्या कारागिरांना स्वतःची बांबू बाग नाही. बांबू त्यांना विकत आणावा लागतो. एका बांबूच्या तुकड्यापासून दोन सुपे तयार केली जातात. बांबूचा तुटवडा आणि प्लॅस्टिकच्या सुपांचे झालेल्या अतिक्रमणामुळे या पारंपरिक व्यवसायालाही आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. तरीही आपली कला व सुपांचा दर्जा आजही कायम राखला जात आहे.
........
सुपांमध्ये विविधता
सुपांमध्ये वेगवेगळ्या आकाराची तसेच एकेरी, दुहेरी, रूमानी, कात्री, फुलवटी, नवघटी, सोळाबंदी, सुपले अशा विणकाम प्रकारची सुपे तयार करून विक्रीसाठी पाठवली जातात. धार्मिक व पुराणांमध्ये सोळाबंदी सूप पवित्र मानले जाते. त्यामुळे त्याला विशेष मागणी आहे. आकले गावातील सुपे हाताने तयार केली जात असल्याने एका दिवसात तीन ते चार सुपे एक व्यक्ती तयार करते. हाताने बनवल्यामुळे या सुपांना विशेष ओळख मिळाली आहे. सध्या बाजारामध्ये आकले गावचे सूप २५०-३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
.....
सध्या सुमारे ३० कुटुंबे या व्यवसायामध्ये आहेत. आमच्या गावाची सुपे दर्जेदार असल्याने त्यांना मागणी आहे. योग्य विक्री व्यवस्था झाल्यास त्यात वाढ होईल.
- दीप्ती पवार, कारागीर
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com