आपत्तीकाळातील संकटग्रस्ंताचा रक्षक

आपत्तीकाळातील संकटग्रस्ंताचा रक्षक

Published on

आपत्तीकाळातील संकटग्रस्तांचा रक्षक
महाडचा चिंतन वैष्णव बचावकार्यात अग्रेसर
सुनील पाटकर ः सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. ३ ः महापूर, चक्रीवादळ किंवा एखादा अपघात अशा आपत्तीकाळात धावून जाणाऱ्या चिंतन वैष्णवने आतापर्यंत शेकडो आपदग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत. केवळ रायगडमध्येच नव्हे तर परराज्यातील आपत्तीतही चिंतन निराधारांचा जीवरक्षक बनला आहे.
महाड शहरातील चिंतन लहानपणापासूनच आपत्तीकाळातील बचावकार्यामध्ये सहभाग राहिला आहे. बी.कॉमची पदवी घेतलेल्या चिंतनने गिर्यारोहण तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेष शिक्षण घेतले आहे. ‘सिस्केप’ संस्थेच्या माध्यमातून ४३ रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेतृत्व केले आहे. याचबरोबर २०१८ आंबेनळी घाटातील बस अपघात झालेल्या ३० जणांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे अवघड काम ४८ तास त्याने केले होते. शिवाय एनडीआरएफ टीमसोबत तांत्रिक बाजू सांभाळली होती. २०२० च्या चक्रीवादळात श्रीवर्धनमध्ये वादळग्रस्तांना मदत केली होती. महाडला २०२१ मध्ये महापुरात मध्यरात्री होडीच्या साह्याने ५२ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते, तर चार वर्षांच्या मुलाला २० फूट खोल पाण्यातून वाचवण्यात यश आले होते. सावित्री पूल दुर्घटनेमध्ये ४० जणांचे बळी गेले. महाड येथे गार्डन इमारत दुर्घटनेमध्येदेखील अग्निशामक दलासोबत ऑपरेशनमध्ये चिंतन कार्यरत होता. पोलादपूरमधील कुडपण येथे मृतदेह शोधण्याचे काम, प्रतापगड येथे सातशे फूट दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यामध्ये चिंतन अग्रेसर होता. तळिये एक गाव दरड दुर्घटनेत शोधकार्य, रेस्क्यू ऑपरेशन, भोरघाट, घागरकोंड, लाडवली पळसगाव, चांभारगड, ताम्हिणी घाट, सांधण व्हॅली, ढाकभैरी नागरिकांचे जीव चिंतनने वाचवले आहेत.
---------------------------------------
प्राण्यांची तस्करी रोखण्यात यश
केरळमध्ये महाप्रलयानंतर वाडी-वस्तीत शिरलेले वन्यजीव, साप यांना पकडून त्यांना जंगलात सोडण्याचे काम चिंतनने अकरा दिवसांत पूर्ण केले. यामध्ये नाग, अजगर अशा सापांचा समावेश होता. महाड परिसरातील सावित्री, काळनदीमधील ६३ मगरींचे यशस्वी बचावकार्य केले आहे. तसेच वन विभागाच्या सहकार्याने खवले मांजर, मांडूळ, अजगर अशा प्राण्यांची तस्करी रोखण्यामध्ये चिंतनने सहभाग घेतला आहे. गिर्यारोहणामध्येदेखील त्याचे काम असून, हिमालयातील माउंट पतलासू शिखराची यशस्वी चढाई केली आहे, तसेत तो स्लॅक लाइनसारख्या साहसी खेळांचा प्रसार करतो.
-------------------------------
विशेष सन्मान
रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून आंबेनळी घाटात उत्तम बचावकार्य केल्याने २०१८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याला विशेष सन्मानपत्र देण्यात आले. २०१९ मध्ये महाड पूरस्थितीत बचावकार्य केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनंत गीते, महाड नगर परिषद व जिल्हा परिषद व विविध संस्थांकडून चिंतनला गौरवण्यात आले. मनसेचे राज ठाकरे यांच्याकडून बचावकार्यासाठी चिंतनचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com