भात शेतीनंतर आता कडधान्यांवर संकट
भातशेतीनंतर आता कडधान्यांवर संकट
परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; भुईमूग, वाल धोक्यात
महाड, ता. ३ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकामागोमाग एक संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील भातशेतीचे मोठे नुकसान करून शेतकऱ्यांना आर्थिक धक्का दिला असतानाच आता रब्बी हंगामातील कडधान्ये आणि भुईमूग लागवडीवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
यावर्षी रायगड जिल्ह्यात सुमारे ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. या पिकांच्या कापणीचे दिवस आले असतानाच मुसळधार अवकाळी पावसाने स्थिती बिकट केली. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने भात कुजून गेला. साधारणतः भातकापणीनंतर शेतकरी वाल, पावटा, मूग, मटकी, हरभरा, तसेच भुईमूग अशा कडधान्यांची लागवड करतात, मात्र सध्या जमीन पूर्णपणे ओली असल्याने या लागवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, मात्र परतीचा पाऊस लांबल्याने जमिनी ओल्या राहिल्या असून, बी पेरणीसाठी योग्य स्थिती तयार झालेली नाही. त्यामुळे बीज कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. भुईमूग लागवडीचा हंगाम साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो, परंतु सप्टेंबरअखेरीपर्यंत पाऊस परत गेला नाही, तर जमीन लागवडीसाठी योग्य राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुन्हा एकदा नुकसान सहन करावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
........................
नगदी उत्पन्नाचे साधन
महाड, गोरेगाव आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये कडधान्य शेती ही शेतकऱ्यांसाठी नगदी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरते. वाल, पावटा, मूग आणि मटकी ही पिके स्थानिक बाजारपेठेसह बाहेरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जातात. विशेषतः महाड तालुक्यातील वरंध आणि आसपासच्या गावांमध्ये जवळपास ४०० शेतकरी दरवर्षी भुईमूग लागवड करतात. भुईमूग शेतीमुळे शेतकऱ्यांना तेलासाठी बी व जनावरांसाठी पेंड उपलब्ध होते, त्यामुळे ही शेती त्यांच्या अर्थचक्राचा प्रमुख भाग आहे.
.....................
दक्षिण रायगडमध्ये सर्वाधिक लागवड
सध्या जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये लागवड केली जाते, ज्यापैकी मोठा भाग दक्षिण रायगडमध्ये आहे, परंतु जमिनीतील ओल आणि अनिश्चित हवामानामुळे ही लागवड मोठ्या जोखमीची ठरत आहे. पंचनामे सुरू झाले असले तरी भातपिकाच्या नुकसानीबाबत मिळणारी नुकसानभरपाई मर्यादित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
..............
कोट
परतीचा पाऊस लांबल्याने शेतजमीन ओली आहे. अशा परिस्थितीमध्ये कडधान्ये लागवड करणे जोखमीचे असल्याने शेतकऱ्याला यातून नुकसान होऊ शकते.
- नामदेव कटरे, कृषी अधिकारी पंचायत समिती, महाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

