पाणीप्रश्नावरून राजकारण पेटणार!
पाणीप्रश्नावरून राजकारण पेटणार!
महाड शहरातील पाणीपुरवठा समस्या बनणार कळीचा मुद्दा
महाड, ता. २६ (बातमीदार) : मागील काही वर्षांपासून महाड शहरांमध्ये उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ही पाणी समस्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा बनणार आहे. वाढते शहरीकरण व लोकसंख्या याचा विचार करता महाड शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाड शहराची रचना उंच व सखल भागामध्ये आहे. मागील २० वर्षांमध्ये महाड शहराचा विस्तार झाला आहे. या तुलनेमध्ये पाणीपुरवठा नियोजन नसल्याने शहरातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. महाड शहराला प्रामुख्याने कुर्ले धरण व कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय एमआयडीसी येथूनही काही प्रमाणात शहरातील पुर्वेकडील व उत्तरेकडील भागात पाणापुरवठा होतो. या ठिकाणांहून दररोज ४० दशलक्ष घनमीटर पाणी नगरपालिका शहराला पुरविते. कोतुर्डे धरणावर २०३१ रोजीची लोकसंख्या गृहीत धरून शहरासाठी योजना आखण्यात आली. परंतु २०१८ पासुनच या योजनेतील पाणी शहराला अपुरे पडत आहे. कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी आणण्यात आले आहे. परंतु या धरणातील पाण्यावर रायगड विभागातील सुमारे २१ गावे अवलंबून आहेत. या धरणातील पाणी गांधारी नदी मध्ये सोडून दिले जाते व त्या पाण्यावर या सर्व गावांना पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये महाड नगरपालिकेला धरणातील मृत साठ्यातील पाणी पंप लावून उपसा करावे लागत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जानेवारी महिन्यापासूनच नगरपालिका पाणी कपातीला सुरुवात करते. पूर्वी महाड शहराला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे, परंतु आता केवळ एकच वेळा पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाई काळात तर शहराला एक दिवसा आड पाणी पुरविले जाते. काही ठिकाणी नगरपालिकेकडून टँकरने देखील पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी पुरवावे लागते. गृहनिर्माण सोसायटींना तर खासगी टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागते.
.......................
उपाययोजनांची गरज
महाड नगरपालिकेने शहरासाठी ६५ कोटींची नवीन नळ पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. परंतु मुळात पाण्याचे स्त्रोत तेच असल्याने नगरपालिका पाणी कुठून आणणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोथेरी येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन धरणातून शहरासाठी नगरपालिका पाणी घेणार आहे, परंतु या धरणाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने शहरात पाणी टंचाई समस्या कायमच राहणार आहे.
कोतुर्डे व कुर्ले धरणातील गाळ काढला गेल्यास पाणीसाठ्यात देखील वाढ होऊ शकते. कुर्ले धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे पाठवला आहे. परंतु त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महाड शहरातील पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या नगरपालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा बनत आहे.
........
फोटो - कुर्ले धरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

