चवदार तळे क्रांतीदिन शताब्दी

चवदार तळे क्रांतीदिन शताब्दी

Published on

चवदार तळे क्रांतिदिन शताब्दी महोत्सव, महामार्ग प्रश्नांवर विधान परिषदेत दरेकरांची ठोस मागणी
महाड-मढेघाट-पुणे व पोलादपूर-महाबळेश्वर-दापोली मार्गाच्या निर्मितीसाठी शासनाकडे आग्रह
महाड, ता. २४ (बातमीदार) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन करावे तसेच कोकणातील पर्यटन व दळणवळण सुलभतेसाठी महत्त्वाच्या महामार्गांच्या निर्मितीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाणी प्राशन करून सामाजिक समतेचा ऐतिहासिक संदेश दिला. हा दिवस महाडमध्ये दरवर्षी ‘चवदार तळे क्रांतिदिन’ म्हणून साजरा केला जातो. या ऐतिहासिक सत्याग्रहाला येत्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून, हा शताब्दी महोत्सव केवळ महाडपुरता मर्यादित न ठेवता देशपातळीवर ‘न भूतो न भविष्यती’ असा देदीप्यमान सोहळा म्हणून साजरा करावा, अशी भूमिका दरेकर यांनी सभागृहात मांडली. चवदार तळे हे संपूर्ण भारतातील समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. यासोबतच कोकणातील पर्यटन, व्यापार व स्थानिक नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्ते प्रश्नांकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले. पुणे-मढे घाटमार्गे महाड हा महामार्ग तसेच महाबळेश्वर-पोलादपूरमार्गे दापोली या महामार्गाच्या निर्मितीसाठी शासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. या दोन्ही महामार्गांमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, प्रवासाचा कालावधी कमी होईल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. चवदार तळे शताब्दी महोत्सव आणि महामार्गांच्या निर्मितीबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा महाड व कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com