काळ नदीवरील शिवथर बंधाऱ्याला गळती;

काळ नदीवरील शिवथर बंधाऱ्याला गळती;

Published on

काळ नदीवरील शिवथर बंधाऱ्याला गळती;
बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; शेतकरीवर्गात नाराजी
महाड, ता. १ (बातमीदार) ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत, उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी व्हावी तसेच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील शिवथर गावाजवळ काळ नदीवर सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र अवघ्या एका वर्षातच या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बंधाऱ्यात पाणी साठत नसून संपूर्ण प्रकल्पच अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्‍यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्‍ह निर्माण होत असून शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे.
राज्य शासनाच्या ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा बंधारा उभारण्यात आला होता. मात्र लाखो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्यात पाणी टिकत नसल्यामुळे उन्हाळी शेती, भाजीपाला उत्पादन आणि पाणी साठवणुकीचा उद्देश पूर्णपणे फसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याच ठिकाणी पावसाळ्यात १८ व १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नदीचा प्रवाह थेट शेतात घुसला. त्यामुळे भाऊ परशुराम साळुंखे या शेतकऱ्याची शेती पूर्णपणे नापीक झाली. या नुकसानाबाबत त्यांनी माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण कामही आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख न झाल्यामुळेच बंधाऱ्याला गळती लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याने शासनाचा ‘पाणी आडवा–पाणी जिरवा’ उपक्रम केवळ कागदावरच राहिला असल्याचे चित्र शिवथर गावात स्पष्टपणे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com