रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसवणार

रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसवणार

Published on

रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसवणार
आमदार प्रवीण दरेकर यांचा विश्वास; विकासकामांना गती देण्याचा निर्धार
महाड, ता. २५ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील मतदारांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास दृढ झाला असून, त्यामुळेच जिल्ह्यात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. या परिवर्तनाला विकासाची दिशा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष बसवण्याच्या निर्धाराने आम्ही सर्वजण काम करत आहोत, असे प्रतिपादन भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
आमदार दरेकर हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २४ जानेवारी रोजी या प्रचार मोहिमेचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामूणकर, बापू सोनगिरे, अमित मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा शिंदे यांच्यासह भाजपा-राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार दरेकर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य, पारदर्शक आणि लोकहितासाठी विनियोग होणे गरजेचे आहे. हे काम आगामी काळात भारतीय जनता पक्ष प्रभावीपणे करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सध्याचे काही जिल्हा परिषद सदस्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःच ठेके घेऊन खोटी बिले काढत निधीचा अपहार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. नगरपालिका निवडणुकांपासून रायगडच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढत असून, प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील जनतेतील नाराजी आगामी निवडणुकांत परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महामार्गांवरील रखडलेली कामे आणि सामान्य नागरिकांना प्रवासात होणारा त्रास आपण स्वतः अनुभवला असून, ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आमदार दरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com