

समग्र शिक्षा योजना बंद; जिल्ह्यातील ११५ कर्मचारी बेरोजगार
महाड, ता. ६ (बातमीदार) : शिक्षण विभागाचा कणा मानली जाणारी समग्र शिक्षा योजना केंद्र सरकारने थांबवल्याने रायगड जिल्ह्यातील तब्बल ११५ कर्मचारी बेरोजगार झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कर्मचारी ९ मार्चपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार असून, यामध्येदेखील रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. ही योजना बंद झाल्याने शिक्षण विभागातील अनेक शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत.
समग्र शिक्षा अभियान ही गुणवत्तेवर भर देणारे पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी भारत सरकारची एक एकात्मिक योजना आहे. ही योजना २०१८-१९ मध्ये सुरू झाली. शिक्षणात समानता आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्ता वाढवणे, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि लिंग भेदभावाच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणे यावर योजनेत भर दिला जातो. या योजनेमध्ये रायगड जिल्ह्यातील सुमारे ११५ कर्मचारी काम करत आहेत. योजनेमधील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सहा महिन्याxची तात्पुरती नियुक्ती देऊन मध्ये एक महिन्याचr सेवा खंड करून त्यांची पुनर्नियुक्ती केली जात होती, परंतु यावर्षी ३१ मार्चनंतर मात्र कोणत्याही प्रकारची पुनर्नियुक्ती करण्यात आली नाही. केंद्र सरकारने ही योजना थांबवल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे .यातील काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. वर्षानुवर्ष या योजनेचा गाडा ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळल्याने अनेक कुटुंब वाऱ्यावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
आझाद मैदान येथे ९ मार्चपासून आंदोलन
राज्यभरातील साडेतीन हजारहून अधिक कर्मचारी या योजनेचा बळी ठरत असल्याने या सर्वांनी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीदेखील सहभाग घेतला आहे. यामध्ये वरिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामवर कार्यक्रम अधिकारी एम आय एस समन्वयक लेखा लिपिक विषयतज्ज्ञ संशोधन सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर साधन व्यक्ती अशा अनेक पदांवर काम करणाऱ्या ११५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अनेक कामे ठप्प
ही योजना थांबल्याने व कर्मचारी कामावर नसल्याने अनेक शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत. शाळा मूल्यांकन, आश्वासन आराखडा, यू-डायस प्लस, निपुण महाराष्ट्र, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, संच मान्यता, पट वाढवा अभियान असे अनेक उपक्रम यामुळे ठप्प झाले आहेत.
समग्र शिक्षा योजनेतून शासनाने अनेक ज्युनियर कंत्राटी कर्मचारी यापूर्वी सरकारी सेवेत घेतले आहेत, परंतु आमच्यासारखे अनेक ज्येष्ठ कर्मचारी मात्र सेवेच्या बाहेर आहेत. आता ही योजना बंद झाल्याने माझ्यासारख्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची कुटुंब वाऱ्यावर पडणार आहेत. काही कर्मचारी तर सेवानिवृत्तीच्या मार्गावरदेखील आहेत.
- हातुराम म्हात्रे, विषयतज्ज्ञ, समग्र शिक्षा योजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.