महाड हुतात्मा दिनाचा स्मृतिदिन आज

महाड हुतात्मा दिनाचा स्मृतिदिन आज
Published on

महाड हुतात्मा दिनाचा स्मृतिदिन आज
हुतात्म्यांना अभिवादन; प्रभाकर भुस्कुटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
महाड, ता. ९ (बातमीदार) : क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर १९४२ रोजी महाड तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या इंग्रजविरोधी किसान मोर्चावर शहरातील पिंपळपार परिसरात ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जण हुतात्मा झाले होते. या घटनेच्या स्मरणार्थ महाडमध्ये दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. यंदाचा ८४वा स्मृतिदिन गुरुवारी (ता. १०) स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समिती, रायगड जिल्हा परिषद आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता शाळा क्रमांक चार येथून हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे अभिवादन सभा होणार आहे.

‘हुतात्मा नथू टेकावले’ चरित्राचे प्रकाशन
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक व राष्ट्रपती पदकप्राप्त प्रभाकर भुस्कुटे गुरुजी यांनी लिहिलेल्या ‘हुतात्मा नथू टेकावले’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे करण्यात येणार आहे. तसेच समितीच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. महाडमध्ये गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून स्वातंत्र्यसैनिक समिती आणि त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीच्या माध्यमातून हुतात्मा दिनाचे आयोजन केले जात आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाला अर्थसहाय्य देत शासकीय स्तरावर त्याची नोंद घेतली. त्यानंतर सुमारे १० वर्षांपूर्वी महाड नगर परिषदेनेही या स्मृतिदिनाच्या आयोजनात संयुक्त सहभागाची जबाबदारी स्वीकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com