मुंबईत २६ जानेवारीपर्यंत १०० ‘एचबीटी’ क्लिनिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत २६ जानेवारीपर्यंत
१०० ‘एचबीटी’ क्लिनिक
मुंबईत २६ जानेवारीपर्यंत १०० ‘एचबीटी’ क्लिनिक

मुंबईत २६ जानेवारीपर्यंत १०० ‘एचबीटी’ क्लिनिक

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या ५२ हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) क्लिनिकला मिळालेल्या प्रतिसादामुळे महापालिका नववर्षात आणखी २० ते २३ क्लिनिक सुरू करणार आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत या क्लिनिकची संख्या १०० पर्यंत पोहोचणार आहे. एचबीटी क्लिनिक २ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळणे शक्य झाले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, लोकांनी सर्दी-खोकल्याच्या सामान्य तक्रारींसह केईएम रुग्णालयासारख्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात जावे असे आम्हाला वाटत नाही. त्यांच्या घराजवळचे क्लिनिक आरोग्याच्या किरकोळ समस्यांसाठी अधिक योग्य असेल. शिवाय, हे दवाखाने कार्यरत असल्याने संध्याकाळच्या शिफ्टमध्येही लोक त्यांची कामे संपल्यानंतर तेथे उपचारांसाठी जाऊ शकतात. मार्च २०२३ पर्यंत २०० एचबीटी क्लिनिक सुरू करण्याचा विचार असल्याचेही डॉ. कुमार यांनी सांगितले.
पालिकेने सुरुवातीला एचबीटी दवाखाने उभारण्याची घोषणा केली होती, तेव्हा ही कल्पना होती. झोपडपट्ट्यांमध्ये चांगली सुविधा मिळावी हेच प्राधान्य आहे. दरम्यान, झोपडपट्ट्यांमध्ये मोकळी जागा मिळणे कठीण असल्याने त्यासाठीही भाडेतत्त्वावर जागा घेण्याच्या प्रस्तावानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच आधीच कार्यरत असलेल्या ५२ दवाखान्यांचा चांगला प्रतिसाद पाहता, अनेक वॉर्ड अधिकाऱ्यांना पोर्टाकेबिनसाठी जागा मिळत आहे, असेही अतिरिक्त आयुक्त म्हणाले.

२६ जानेवारीपर्यंत एचबीटी क्लिनिकची संख्या १०० पर्यंत वाढवायची आहे. तसेच मार्चपर्यंत २०० एचबीटी क्लिनिक सुरू करण्याचा विचार आहे. या २०० पैकी किमान १०० पोर्टाकेबिन्स असतील. एसआरए इमारतींपासून ते उच्चभ्रू वसाहतीतही एचबीटी सुरू केले जातील.
- डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त

बीएमएस डॉक्टरांची नियुक्ती-
पालिकेला प्रति १ लाख लोकसंख्येमागे पाच एचबीटी दवाखाने उभारायचे आहेत. दरम्यान, यासाठी बीएमएस डॉक्टर्स आणि आशा वर्कर्सची नियुक्ती केली जाणार आहे. आतापर्यंत दीड लाख नागरिकांवर या अंतर्गत उपचार केले गेले आहेत. बीएमएस डॉक्टर्स घरोघरी जाऊन लोकांचे मार्गदर्शन करतील. हे डॉक्टर्स लोकांचा पाठपुरावा करतील. तसेच औषधांचा पुरवठा अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देतील. एक हजार लोकांसाठी एक आशा वर्कर असेल, असे नियोजन केले जात आहे. उपचारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणे, शिवाय, औषधांची विचारपूस या आशा वर्कर्स करतील. गरोदर महिलांची तपासणी, लहान मुलांचे वजन, ॲनिमिया यावर त्यांच्यामार्फत लक्ष दिले जाईल. या सर्वांवर नियंत्रण रहावे यासाठी बीएमएस डॉक्टर्स आणि दोन परिचारिका प्रत्येक केंद्रात असतील.