
सेन्सेक्समध्ये १२६ अंशांची वाढ
मुंबई, ता. ३ ः चीनची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत होत असल्याच्या अपेक्षेमुळे आज (ता. ३) सर्वत्र आशादायक वातावरण राहिले. त्यामुळे भारतीय शेअरबाजारतही खरेदी झाली व निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी वाढले. सेन्सेक्स १२६.४१ अंश; तर निफ्टी ३५.१० अंशांनी वाढला.
आज जागतिक शेअरबाजारांमध्ये फारसे नकारात्मक वातावरण नसल्याचा फायदा भारतीय शेअर बाजारांना झाला. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती कंपन्या, बँका आणि अर्थसंस्था तसेच औषध कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स ६१,२९४.२० अंशावर; तर निफ्टी १८,२३२.५५ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील महिंद्र आणि महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, एशियन पेंट, आयटीसी या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का कोसळले; तर अॅक्सिस बँक, टायटन, टीसीएस, टेक महिंद्र या शेअरचे भाव दीड ते अडीच टक्के वाढले. सन फार्मा, इंडसइंड बँक, विप्रो, नेस्ले, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एचडीएफसी बँक व एअरटेल या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का वाढले.
-------------
रुपया ८ पैसे पडला
भारतीय रुपया आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी पडून ८२.८६ वर स्थिरावला. रुपयाचे व्यवहार ८२.६९ वर सुरू झाले व तो ८२.९२ पर्यंत घसरला होता. सोमवारी तो ८२.७८ वर बंद झाला होता.