महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करा
महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करा

महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करा

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाचीदेखील भूमी आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते.

विश्व मराठी संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करून गडकरी म्हणाले, मराठी संस्कृतीचे महत्त्व आपण बाहेर देशात असताना प्रभावीपणे जाणवते. आज विविध क्षेत्रांत मराठी माणूस पुढे गेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याबरोबरच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यामध्ये विदेशात असलेल्या भारतीयांचे योगदान खूप मोठे आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली, येथील उद्योजकता वाढवली, तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, जगभरातील मराठी उद्योजकांचे महाराष्ट्रात विशेष स्वागत आहे, त्यांना नेहमीच ‘रेड कार्पेट’ वागणूक दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उद्योगविकासाला चालना
आपणा सर्वांना मिळून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. यासाठी पाणी, वीज, दळणवळण आणि संपर्क साधने यावर विशेष भर द्यावा लागेल. या सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी उद्योग विकासाला मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यायोगे ग्रामीण महाराष्ट्रात उद्योगविकासाला चालना मिळेल, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केला.