
बेस्टच्या आगारांत ई-चार्जिंग
मुंबई, ता. ८ : शहरामध्ये ई-वाहन खरेदी वाढू लागल्याने ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याला प्राधान्य दिले जात आहे. येत्या दोन महिन्यांत सुमारे ३३० चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहेत. बेस्टच्या २६ आगारांत ई-चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. माफक दरामध्ये चार्जिंग करता येणार असल्याने ई-वाहनचालकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
मुंबईत साधारण १५ हजारांहून अधिक ईव्ही वाहनांची नोंद झाली आहे. राज्यातील आकडा एक लाखाहून अधिक आहे. मुंबईत दहा महिन्यांत ई-वाहनांच्या खरेदीमध्ये ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील वाहने त्यांच्या चार्जिंग गरजेच्या ८० टक्क्यांपर्यंत होम चार्जिंगवर अवलंबून असतात. सध्या होम चार्जिंगला परवानगी नाही. शिवाय चार्जिंगला अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ लागतो. पर्यायी चार्जिंग स्टेशन सुरू होईपर्यंत सोसायट्यांना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील ई-वाहन खरेदीचा वाढता कल लक्षात घेता चार्जिंग स्टेशन उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत ३३० नवीन चार्जिंग स्टेशन सुरू होत आहेत. त्यातील बहुतेक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. बेस्टच्या आगारांमध्येही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील ई-चार्जिंग स्टेशनची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
इतरही सुविधा...
- बेस्ट बससाठी काही चार्जिंग स्टेशन आरक्षित राहण्याची शक्यता आहे. बाकी स्टेशनवर तीन-चार चाकी, व्हॅन वा बस अशी सर्व प्रकारची वाहने चार्ज करता येणार आहेत.
- माफक दरात चार्जिंगची व्यवस्था उपलब्ध असेल. चार्जिंग स्टेशनवर इतर सुविधाही दिल्या जाणार असल्याने त्याचाही फायदा वाहनचालकांना होणार आहे.
इथे सुरू होतील चार्जिंग स्टेशन
बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, आणिक आगार, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मरोळ, दिंडोशी, मागाठणे, गोरेगाव, वरळी, वडाळा, वांद्रे, प्रतीक्षा नगर, धारावी, महेश्वरी उद्यान, सांताक्रूझ, देवनार, शिवाजी नगर, मालाड, ओशिवरा, मालवणी, पोईसर आणि गोराई.