
हाऊसगल्ल्यांची लवकरच स्वछता
मुंबई, ता. ११ : दक्षिण मुंबईतील हाऊसगल्ल्यांच्या साफसफाईच्या समस्येवर पालिकेने तोडगा काढला आहे. जनजागृतीबरोबरच सफाईच्या कामासाठी संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पायधुनी, महम्मद अली रोड, भेंडी बाजार, डोंगरी, जे. जे. रुग्णालय परिसर आदी विभागांतील हाऊसगल्ल्यांच्या साफसफाईसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कामाची सुरुवात बी विभागातून होणार असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण मुंबईतील दोन चाळींमधील असलेल्या हाऊसगल्ल्यांची संख्या अधिक आहे. दक्षिण मुंबईत पायधुनी, महम्मद अली रोड, भेंडी बाजार, डोंगरी, जे. जे. रुग्णालय, चंदनवाडी, ग्रँट रोड व भायखळा विभागात मोठ्या प्रमाणात चाळी आहेत. दोन चाळींमध्ये जेमतेम तीन ते चार फूट अंतर असल्याने हाऊसगल्ल्यांतील कचरासफाईचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. तिथे कचरा टाकू नका, असे अनेकदा चाळकऱ्यांना सांगूनही कोणी त्याची दखल घेत नाही अशी परिस्थिती आहे. घरगल्ल्या साफ केल्यानंतर महिनाभरातच कचऱ्याचा ढीग पुन्हा तयार होतो. सध्या हाऊसगल्लीतील कचरा महापालिकेच्या माध्यमातून साफ केला जातो; पण वेळोवेळी पालिकेला ते शक्य होत नाही. वास्तविक चाळीमध्ये राहणाऱ्यांनी कचरापेटीचा वापर केल्यास हाऊसगल्ल्या कायमस्वरूपी स्वच्छ राहतील, असे पालिकेच्या घनकचरा विभागाचे म्हणणे आहे; मात्र प्रबोधनानंतरही नागरिकांच्या सवयी जात नसल्यामुळे पालिकेने आता हाऊसगल्ल्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी सामाजिक संस्थांवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
विभागनिहाय संस्थांची नियुक्ती
- पायधुनी, महम्मद अली रोड, भेंडी बाजार, डोंगरी, जे. जे. रुग्णालय परिसर इत्यादी हाऊसगल्ल्यांच्या वाढत्या तक्रारी पाहून पहिल्या टप्प्यात सर्व परिसरातील घरगल्ल्यांची साफसफाई करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- दक्षिण मुंबईतील घरगल्ल्या साफ करण्यासाठी टप्प्याटप्प्याने विभागनिहाय संस्था नियुक्त केल्या जातील. महापालिकेने संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज आल्यानंतर पात्रता यादी तयार करून काम करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- घरगल्ल्यांची स्वच्छता करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी २६५० रुपये व त्यावर जीएसटी एवढी रक्कम नागरी सुविधा केंद्रात १९ जानेवारी २०२३ पूर्वी भरावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.