
शिक्षक परिषदेचे अस्तित्त्व धोक्यात
मुंबई, ता. १६ : कोकण शिक्षक मतदारसंघातून तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ विधान परिषदेत आमदार देणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भाजपपुढे हतबल झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी आज काही नेत्यांच्या दबावामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज संघटनेकडे सादर केला, अशी माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. परिणामी या संघटनेचे अस्तित्त्वच धोक्यात आल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघात उमटत आहेत.
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातून शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना कडू यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे बोलले जाते. पदाधिकाऱ्यांच्या काल पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत कडूंच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यातच आज कडून यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच तब्बल दहा वर्षाच्या कार्यकाळानंतर शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
----
दोन दशके होता दबदबा!
शिक्षक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कडू हे मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शिक्षक परिषद कमजोर झाल्याचा आरोप करण्यात आला. गेली दोन दशके परिषदेचा शिक्षक मतदारसंघात मोठा धबधबा होता. परिषदेकडून वसंतराव बापट, सुरेश भालेराव आणि रामनाथ मोते हे आमदार म्हणून निवडून आले होते; मात्र मागील निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षांनीच केलेल्या चुकांमुळे ही जागा शेकापच्या बाळाराम पाटील यांच्याकडे गेली होती. यावेळी झालेल्या चुका सुधारून निवडणूक नव्याने लढवता आली असती, परंतु कडू यांनी पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवल्याने परिषदेचे नाव धुळीस मिळवल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
----
सन्मानासाठी उमेदवारी मागे!
आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोन आले होता. त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण स्वखुशीने ही उमेदवारी मागे घेत असल्याचे वेणूनाथ कडू यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.