जलशुद्धीकरण केंद्रात सीसीटीव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलशुद्धीकरण केंद्रात सीसीटीव्ही
जलशुद्धीकरण केंद्रात सीसीटीव्ही

जलशुद्धीकरण केंद्रात सीसीटीव्ही

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातही सीसी टीव्ही बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी भांडुप येथील जलप्रक्रिया केंद्रासोबत तुळशी जलप्रक्रिया केंद्र येथेही सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून येत्या महिनाभरात सीसी टीव्ही बसवण्यास सुरुवात होईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई शहराला सात तालवांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा हे मोठे तलाव ठाणे जिल्ह्यात; तर अप्पर वैतरणा तलाव नाशिक जिल्ह्यात आहे. या तलावांतून दररोज सुमारे १०० किलोमीटरवरील मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा होतो. तलावातून येणाऱ्या पाण्याचा थेट पुरवठा न करता हे पाणी पिसे पांजरापूर आणि भांडुप संकुल येथे शुद्धीकरण करून त्याचा मुंबईकरांना पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सुरक्षित असावे, या उद्देशाने महापालिकेने भांडुप संकुलासह पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सीसी टीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी भांडुप संकुल येथे सीसी टीव्ही बसवण्यात आले असून आता पिसे पांजरापूर येथेही सीसी टीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे सुरक्षित होणार असल्याचा दावा पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून करण्यात आला.
---
जलवाहिन्यांच्या सुरक्षेत वाढ
साधारणतः १०० किमीचा प्रवास करून मुंबईला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेही वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सध्या जलवाहिनी परिसरात सुरक्षा विभागाकडून दिवस-रात्र गस्त घालण्यात येते. सुरक्षारक्षकांची संख्याही वाढवण्यात आली आहे. जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच जलवाहिन्यांलगत झोपड्यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.