मुंबई प्रदूषममुक्तीच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई प्रदूषममुक्तीच्या दिशेने
मुंबई प्रदूषममुक्तीच्या दिशेने

मुंबई प्रदूषममुक्तीच्या दिशेने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईतील घसरलेल्या हवेच्या गुणवत्तेने पालिकेची चिंता वाढवली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी वायुप्रदूषण नियंत्रण कृती योजनेसाठी विशेष तरतूद केली आहे. मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरील व बांधकामातील धूळ, वाहतूक कोडी, उद्योग व ऊर्जा क्षेत्र आणि कचरा जाळणे हे चार प्रमुख घटक कारणीभूत आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, वायुप्रदूषकांचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने पालिकेमार्फत मुंबई स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत सात योजना राबवण्यात येणार आहेत.
मुंबई स्वच्छ हवा उपक्रम तीन व्यापक उद्दिष्टांसाठी कार्य करणार असून त्यात विविध क्षेत्रांतील प्रदूषण केंद्रीकरण पातळीवर नियंत्रण ठेवणे, शहरासाठी बहुस्तरीय देखरेख धोरण सुरू करणे आणि प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नियोजनाचे विकेंद्रीकरण करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणे यावर भर देण्यात येणार आहे. पालिकेने या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

वायू गुणवत्तेसाठी धोरणे :

स्वच्छ बांधकाम व निष्कासन पद्धती
शहरातील एकूण उत्सर्जनामध्ये बांधकाम व निष्कासन कचऱ्याचा मोठा वाटा आहे. त्‍या दृष्‍टीने पालिकेकडून उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यासाठी बांधकाम व्यावसायिकांकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात येणार असून इमारतींच्या बाह्य भागावर धूळरोधक पडदे (डस्ट स्क्रिन) लावणे, धूळरोधक पडद्यावर व तळमजल्यावरील मोकळ्या जागेत पाणी शिंपडणे, बांधकामाच्या ठिकाणावरून बाहेर पडताना सर्व वाहनांची चाके धुणे, भंगार व बांधकाम कचऱ्याची वाहतूक करणारी सर्व वाहने झाकणे यांचा समावेश आहे.

बांधकाम व निष्कासन कचरा व्यवस्थापन नियम (२०१६) ची अंमलबजावणी केली जाणार असून बांधकामाच्या ठिकाणी धूळप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शीट पडदे उभारणे अशी अट घालण्यात येणार आहे.

रस्त्यावरील धूळ कमी करण्याचे उपाय
गेल्या दशकभरात शहराच्या एकूण प्रदूषणात रस्त्यावरील धुळीचा वाटा दुपटीहून अधिक वाढला आहे. विविध कामांमुळे होणारी रस्त्यावरील धूळ, वाहनांमुळे तयार होणारे धूलीकण हवेत मिसळतात. शहरातील रस्त्यांवरील धूळ प्रभावीपणे कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून यांत्रिकी ई-पॉवर स्वीपरचा वापर, रस्ते आणि पदपथांवरील धूळीस अटकाव करण्यासाठी स्किलर खरेदी करणे, वाहन विराजित मिस्टिंग उपकरणे कार्यान्वित करणे, वाहन विराजित वायू शुद्धीकरण युनिट्स कार्यान्वित करणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

ई वाहनांवर भर
मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्याचे ई-वाहन ताफ्यात रूपांतर करणे आणि चार्जिंग सुविधा पुरविणे, बेस्टकरिता ३००० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येत आहेत. पालिकेच्या जुन्या डिझेल / पेट्रोल वाहनांचे सी. एन. जी. वाहनांमध्ये रूपांतर करणे, मुंबईतील मोठ्या ३९५ वाहतूक नाक्यांवर वाहतूक अनुकूल नियंत्रण प्रणाली बसविण्यात येईल.

शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाययोजना :
काही ठिकाणी कचरा जाळल्यामुळे आणि अशाश्वत पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे धूलीकणांचे उत्सर्जन वाढून वायुप्रदूषणात भर पडते. त्यासाठी पालिका घरोघरी शाश्वत कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांशी संवाद साधणे आणि जागरुकता निर्माण करणे, कचरा जाळण्यावर देखरेख आणि बंदीची अंमलबजावणी करणे, देवनार क्षेपणभूमी येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे (टप्पा-१) बांधकाम पूर्ण करणे, देवनार क्षेपणभूमी येथे पूर्वापर असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग, आठ ठिकाणी चार टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रांची उभारणी, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत वृक्षारोपण पद्धतीद्वारे १ लाख झाडे लावण्यात येतील.

प्रभावी देखरेख
स्वच्छ हवा कृती योजनेच्या समन्वित आणि सर्वांगिण अंमलबजावणीसाठी सक्षम वायू गुणवत्ता निरीक्षण प्रणाली ५ अविरत वातावरणीय वायू गुणवत्ता देखरेख केंद्रांची उभारणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी, आय.आय.टी. मुंबई आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहाय्याने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातर्गत उत्सर्जनाचे विभागस्तरावर मोजमाप, हॉटस्पॉट मॉनिटरिंग सुरू करणे, शहराची कृती योजना प्रभावी करण्यासाठी ‘हायपर लोकल मॉनिटरिंग’ सुरू करणे, तेल शुद्धीकरण कारखाने, वीज प्रकल्प व इतर प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधणे.

संपर्क आणि जागरूकता मोहीम
शहरातील वायुप्रदूषणापासून आरोग्याच्या जोखिमांची माहिती देण्यासाठी जागरुकता निर्माण करणे आणि नियमितपणे आरोग्य सल्ला प्रसारित करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी वायुप्रदूषण जागरुकता मोहीम राबविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीवर इको क्लब तयार करणे, पर्यावरण संवर्धन आणि वृद्धीसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत सहयोग, रस्त्यांवरील धूळ चांगल्या पद्धतीने साफ करण्याकरिता स्वच्छता कामगारांचे प्रशिक्षण, शहरातील हवेची गुणवत्ता ज्या दिवशी बिघडेल तेव्हा नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सूचना जारी करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.