
विद्यार्थ्यांवरील गुन्हा रद्दबातल
मुंबई, ता. ४ : नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या ३६ जणांविरोधातील गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्दबातल केला आहे. मुंबईमधील एस्प्लानेड न्यायालयात पोलिसांनी याबाबत अहवाल सादर केला आहे.
जानेवारी २०२० मध्ये घडलेल्या या घटनेनंतर मुंबईमध्ये गेट वे आॅफ इंडियाला तरुण विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले होते. याबाबत पोलिसांनी ३६ जणांविरोधात परवानगी नसताना आंदोलन पुकारणे, मेणबत्ती पेटवणे, जमाव गोळा करणे असे आरोप ठेवले होते. मात्र संबंधित आरोप मागे घेणारा अहवाल नुकताच न्यायालयात पोलिसांनी दाखल केला. आंदोलक विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला नाही, यामध्ये त्यांचा व्यक्तिगत हेतू नव्हता आणि कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान त्यांनी केले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. व्ही. दिंडोकर यांनी हा अहवाल मान्य केला आहे.