
तीन लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत ‘घराजवळ दवाखाना’ संकल्पनेवर सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र (एचबीटी) अर्थात ‘आपला दवाखाना’ झोपडपट्टीवासीयांसाठी उपयुक्त ठरत आहे. तीन महिन्यांत तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी या आरोग्य केंद्रात मोफत करण्यात आली आहे. सध्या १०६ दवाखाने सुरू असून मार्च अखेरपर्यंत आणखी १०२ दवाखाने सुरू होतील, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला.
एचबीटी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना पाच ते १० मिनिटांच्या अंतरावर उपचार मिळावेत, मोठ्या रुग्णालयात जाण्याचा वेळ वाचावा आणि मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा यासाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत विविध ठिकाणी आतापर्यंत १०६ दवाखाने सुरू झाले असून १४७ प्रकारच्या मोफत रक्तचाचण्या करण्यात येत आहेत. या ‘पोर्टा केबीन’ आरोग्य केंद्र उपक्रमात एक डॉक्टरसह दोन परिचारिका उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यात ५२ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १०६ दवाखाने सुरू झाले आहेत.
आपला दवाखान्यांमधून दोन लाख ८८ हजार २० रुग्णांनी आतापर्यंत मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला आहे; तर पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १३ हजार ५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे. सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत ही आरोग्य केंद्रे सुरू राहणार असल्याने रात्री कामावरून घरी परतणाऱ्यांसाठीही हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दवाखान्याने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एक लाख; तर ७ जानेवारी २०२३ रोजी दोन लाख लाभार्थ्यांचा आकडा गाठला होता. सध्या या दवाखान्याने तीन लाख लाभार्थ्यांची संख्या पूर्ण केली आहे.
तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांची माहिती
आपला दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.