
कोटक बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस फंड बाजारात
मुंबई, ता. ६ : कोटक महिंद्र असेट मॅनेजमेंट कंपनीतर्फे आज कोटक बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड बाजारात आणल्याची घोषणा करण्यात आली. या योजनेतील निधी बँका आणि अर्थसंस्था यांच्या शेअरमध्ये गुंतवला जाईल.
आजपासून हा इशू खुला झाला असून २० फेब्रुवारीपर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. यात किमान पाच हजार रुपये गुंतवता येतील व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. बँका आणि अर्थसंस्थांचे शेअर आणि शेअरशी संबंधित आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन नफा मिळवणे, हा या फंडाचा हेतू आहे. अर्थात गुंतवणुकीतून मिळणारा परतावा बाजार जोखमीच्या अधीन असेल, असेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी वाढ बघता बँका आणि वित्तसंस्था या दीडपट ते दुपटीने वाढत आहेत. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची जशी वाढ होईल, तशी बँका आणि वित्तसंस्थांची देखील वाढ होत जाईल, असा विश्वास कोटक महिंद्र म्युच्युअल फंडाच्या वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (फंड मॅनेजर) शिबानी कुरियन यांनी व्यक्त केला.
----------
गुंतवणुकीच्या संधी शोधणार
कोटक बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस फंडातर्फे बँका, बिगर बँक वित्तसंस्था, विमा कंपन्या, ब्रोकिंग कंपन्या, अॅसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्यात गुंतवणूक केली जाईल. तसेच बँकिंग आणि वित्त संस्था-वित्त सेवा क्षेत्राच्या उपक्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी शोधल्या जातील, असे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (फंड मॅनेजर) शिबानी कुरियन यांनी यावेळी सांगितले.