मुंबईतील वाहनतळ धोरणाला ‘बूस्टर’

मुंबईतील वाहनतळ धोरणाला ‘बूस्टर’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : मुंबईकरांना भेडसावणारी वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ (एमपीए) स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ मधील विशेष तरतुदी अंतर्गत या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असून पालिकेच्या २४ विभागांतील वाहनतळ व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या प्राधिकरणामुळे मुंबईकरांची सुरक्षा, सुलभता व सार्वजनिक हित वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये अनिवार्य केल्याप्रमाणे, रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबई वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाच्या भागीदारीने, तरुण वाहतूक व्यावसायिक नगर रचनाकार व संकल्पचित्रकार, धोरण संशोधक, तज्ज्ञ आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञ यांच्या टीमसह मुंबई वाहतूक प्राधिकरणाच्या स्थापनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भातील कामाच्या आखणीनुसार २०१९ पासून या टीमने ९ बाबींवर काम सुरू केले आहे. तर पुढील वर्षभरात ५ बाबींवर काम केले जाणार आहे.

पाहिल्या टप्प्यासाठी २०२२-२३ च्या सुधारित अंदाजामध्ये ३२०३.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती; तर पुढील कामासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १२८२५.०६ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. रस्त्यावरील प्रवासाच्या अनुभवाचा एकूणच दर्जा उंचावण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उपाययोजना, वाहतूक चिन्हे, रेखांकने आणि सुनियोजित संदेशवहन याद्वारे मुंबईकरांची सुरक्षा, सुलभता व सार्वजनिक हित वृद्धिंगत करण्याकरिता मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. वाहनतळांमधून मिळणारे उत्पन्न हे इतर कामांसोबतच वाहनतळांच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा तसेच पादचारी सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे.

‘यावर’ काम सुरू
१. पालिकेच्या २४ विभागांतील वाहनतळ व्यवस्थापनाचा आराखडा करणे
२. प्रस्तावित सुधारणा नगर विकास खात्याच्या मान्यतेकरिता सादर
३. वाहनतळामध्ये केंद्रीय संगणक प्रणालीची रचना
४. हार्डवेअर व्यवस्थेद्वारे ‘मुंबई पार्किंग इंटरफेस’चे (एमपीआय) काम प्रगतिपथावर
४. एम/पूर्व विभागात भूमिगत वाहनतळांच्या प्रस्तावाबाबत पडताळणी सुरू
५. नवीन वाहनतळ संकल्पनेकरिता बनवलेल्या चिन्हाला मान्यता
६. दर रचनेसह तयार केलेले वाहनतळ धोरण मान्यतेच्या प्रक्रियेत

‘या’ बाबींवर काम करणार
१. नवीन दर रचनेसह बृहन्मुंबई वाहनतळ धोरणाची (बीपीपी) अंमजबजावणी
२. मुंबई पार्किंग पूलमध्ये अधिकाधिक संस्थांचा अंतर्भाव करणे.
३. प्राधिकरणाच्या कायदेशीर स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला सहाय्य करणे
४. ‘एमपीआय’करिता सॉफ्टवेअर व हार्डवेअर, नागरिकांकरिता अॅप तसेच विविध पार्किंग व्यवस्थांकरिता केंद्रिय खुली एपीआय प्रणालीचा स्थापना करण्यात येईल. वाहनतळांची उपलब्धता, बुकिंग व शुल्क देण्यासाठी नागरिकांना ॲपची सुविधा.
५. विभागीय वाहनतळ व्यवस्थापन आराखड्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करून त्याअनुषंगाने सर्व विभागांमध्ये आराखड्याचा विस्तार करणे, या बाबींचा वाहनतळ धोरणात समावेश करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com