
भांडुपमध्ये घराचे बांधकाम कोसळून दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : भांडुपच्या पश्चिमेला असणाऱ्या खिंडीपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या घराचा भाग कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये दबून दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणेदहा वाजता हा अपघात झाला.
भांडुप पश्चिम येथील डंकन लिंक रस्त्यावरील दुर्गा माता मंदिराजवळ एक मजल्याचे घर बांधण्याचे काम सुरू होते. अचानक घराचा एक भाग खाली पडला. या अपघातात दोन जण गाडले गेले. राजकुमार राम सहाय (वय २१) आणि रामावतार अर्जुन यादव (वय १८) यांना स्थानिक लोकांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजीकच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिस आणि पालिकेचे कर्मचारी यांनी ढिगारा उपसण्याचे काम तत्काळ सुरू केले. ढिगाऱ्यात आणखी कोणी नाही, त्याचा शोध घेण्यात आला. तीन तास ढिगारा उपसल्यानंतर त्याखाली आणखी कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी दिली.