‘आयआयटी’तील समुपदेशन यंत्रणा कुचकामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयआयटी’तील समुपदेशन यंत्रणा कुचकामी
‘आयआयटी’तील समुपदेशन यंत्रणा कुचकामी

‘आयआयटी’तील समुपदेशन यंत्रणा कुचकामी

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : आयआयटी मुंबईत विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या अथवा मानसिक दडपणाखाली सापडलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर आणि नीट समुपदेशन मिळत नाही. त्यासाठी असलेली यंत्रणाच कुचकामी असल्याने आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी आयआयटीतील वसतिगृहात दर्शन सोलंकी या बी.टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दर्शनच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटीतील समुपदेशन यंत्रणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे दर्शनच्या आत्महत्येनंतर कित्येक तास आयआयटी प्रशासनाकडून घटनेची माहिती लपवण्यात आली होती. समुपदेशासाठी असलेल्या काही व्यक्ती आपले कर्तव्य नीट बजावत नाही. त्यांच्यात सर्वसमावेशक अशी मानसिकताच नसल्याने त्यांच्याकडून नीट मदत मिळू शकली नसल्याने विद्यार्थ्यांना दडपणाखाली आल्यास नीट मार्गर्शन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
एवढेच नव्हे, तर दर्शनच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकुलात विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतरही प्रशासन गंभीर झाले नसल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दर्शन सोलंकीला त्याच्या कॅम्पसमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत त्याच्या जातीची वारंवार आठवण करून दिली जात होती. त्याविरुद्ध त्याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला; पण ते सहन होऊ शकले नाही. त्यामुळे सोळंकी याची आत्महत्या ही संस्थात्मक व्यवस्थेचा बळी असल्याचेही म्हणणे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. शिवाय तो विद्यार्थी दलित असल्याने त्याला तशा प्रकारचा त्रास झाला असावा आणि त्या दडपणाखाली आला असावा, असा अंदाजही विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
---
शोकसभेत बोलण्यास मज्जाव?
दरम्यान, दर्शनच्या शोकसभेच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांना बोलू दिले नाही. काहींची अडवणूक केली असल्याने त्याविरोधात विद्यार्थी संघटनांकडून आयआयटी प्रशासनाला ई-मेलच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला जाणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
---
जातीभेदाचा कोणताही सामना नाही!
आयआयटी मुंबईत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यासाठी कक्ष असून समुपदेशक नेमण्यात आले आहेत. येथे भेदभावासह कोणत्याही समस्या असल्यास विद्यार्थ्याना मदत केली जाते; मात्र या कक्षाकडे फारच कमी तक्रारी आहेत, पण आलेल्या तक्रारींचा लगेच निपटारा केला जातो. सोलंकीच्या प्रकरणात मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याला कोणत्याही जातीय भेदभावाचा सामना करावा लागला नसल्याचे कळते. त्यामुळे संघटनांकडून होणारे आरोप चुकीचे असल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे.