
विशाळगड परिसरातील अतिक्रमणांना तूर्तास दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कोल्हापूरमधील विशाळगड परिसरात असलेल्या कथित अतिक्रमणांवर तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुरातत्त्व विभागाने येथील रहिवाशांना जागा मोकळी करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. संबंधित गड परिसरात त्यांच्या मालकीच्या जमिनी असून मागील कित्येक वर्षे आम्ही तेथील रहिवासी आहोत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयात गुरुवारी (ता. १६) या प्रकरणी सुनावणी झाली असून पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत. याचिकेत राज्य सरकार, पुरातत्त्व विभागाला प्रतिवादी केले आहे. प्रशासनाने निवडक विशिष्ट गटातील रहिवाशांना यामध्ये लक्ष्य केले असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. तसेच कट्टरतावादी संस्था यामध्ये विनाआधार आरोप करत असून त्यावरून कारवाई करण्यात येत आहे, असा दावा केला आहे.