पोलिस निरीक्षक सुनील माने माफीचा साक्षीदार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस निरीक्षक सुनील माने माफीचा साक्षीदार!
पोलिस निरीक्षक सुनील माने माफीचा साक्षीदार!

पोलिस निरीक्षक सुनील माने माफीचा साक्षीदार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : एंटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेला पोलिस निरीक्षक सुनील मानेने या खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी मुंबई विशेष एनआयए न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे मागितली आहे. मला पश्चाताप होत आहे, असे त्याने या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.

माने सध्या तळोजा कारागृहात असून, तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीला हजर झाला होता. यावेळी त्याने अर्जाची माहिती न्यायालयात दिली. स्वतःच्या हस्ताक्षरात त्याने हा अर्ज गुरुवारी (ता. १६) लिहिला असून न्यायालयात पाठविला आहे. विशेष न्या. ए. एम. पाटील यांनी एनआयएला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. चुका सुधारण्यासाठी मी सर्व माहिती सांगून माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. या प्रकरणातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, असे मला वाटत असल्याचे त्याने सांगितले. तसेच न्यायालयाने या प्रकरणात फौजदारी दंडसंहिता कलम ३०७ नुसार माफी द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे. वाझेच्या वतीने आज या अर्जाला विरोध करण्यात आला आहे.

काय म्हटलेय अर्जात?
‘माझ्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत मी नेहमीच उत्तम, उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारसह मला आतापर्यंत २२६ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिस सेवेत असल्यामुळे देश आणि नागरिकांचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य होते; पण दुर्दैवाने आणि नकळतपणे माझ्याकडून चुका झाल्या. मी कारागृहात असताना मला या चुकांची जाणीव झाली. आता मला या चुका सुधारायच्या आहेत,’ असे पोलिस निरीक्षक सुनील मानेने पत्रात लिहिले आहेत.