
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मुंबईत एल्गार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी सुरू केलेल्या बेमुदत कामकाज बहिष्कार आंदोलनामुळे आज राज्यातील अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला. प्रशासनाकडून आमच्या मागण्यांसंदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात चलढकलपणा केला जात आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाज म्हणून हे आंदोलन बेमुदत सुरू करावे लागले असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
मुंबई विद्यापीठ तसेच एसएनडीटी विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयांत आज कर्मचारी संघटनांनी बेमुदत कामकाज बंद आंदोलन सुरू केले. विविध महाविद्यालयांत आणि विद्यापीठ संकुलात कर्मचारी संघटनांनी ठिय्या आंदोलन करत उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. १५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जे आश्वासन देण्यात आले होते, त्याचे इतिवृत्त आमच्या हाती येणे अपेक्षित होते; परंतु उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये गोंधळ घालून ते इतिवृत्त चुकीचे दिल्यामुळे आंदोलन सुरू राहिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
दिवसभर राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कोणत्याही कामकाजात शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी भाग घेतला नव्हता; मात्र सायंकाळी उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर परत आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे; मात्र आम्ही आमच्या रास्त मागण्या पुढे घेऊन न्याय व हक्काची लढाई लढत आहोत. त्यामुळे दबाव तंत्राचा आमच्यावर प्रशासनाने वापर करू नये अन्यथा आम्हाला हे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
काय आहेत मागण्या?
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कायम ठेवणे, १ जानेवारी २०१६ पासून देय असलेली सातवा वेतन आयोगातील फरकाची थकबाकी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्य करणे, विद्यापीठातील १४१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्यास परवानगी देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.