
नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई, ता. २२ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने चौदा दिवसांची वाढ केली आहे. मलिक सध्या कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. आज विशेष न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या हस्तकांमार्फत कुर्ल्यातील मालमत्ता मलिक यांनी हस्तगत केल्याचा गुन्हा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने मलिक यांच्या आजाराचा तपशील दाखल करण्याचे निर्देश ईडीला दिले होते, तसेच पीएमएलए कायद्याच्या कक्षेत आजारी व्यक्ती म्हणून कोणते निकष आहेत, याचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मलिक सध्या किडनीविकाराने त्रस्त आहेत. कारागृहात आवश्यक उपचार होणार नाही, त्यामुळे जामीन मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली होती.