
शैक्षणिक धोरणामुळे नवी ऊर्जितावस्था
मुंबई, ता. २३ ः शैक्षणिक प्रणालीत आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करणारे आणि समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे अगदी योग्य वेळेस आले आहे. या शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था सक्षम होण्यासोबत तिला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असे मत राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी मांडले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा गुरुवारी (ता. २३) मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण दोन लाख सात हजार १४५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यात पदवीच्या एक लाख ७५ हजार ६०२; तर पदव्युत्तर पदवीच्या ३१ हजार ५४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाखानिहाय पदव्यांमध्ये मानव्यविद्या शाखेसाठी २६ हजार ६४५, आंतरविद्याशाखेसाठी ४ हजार ९३७, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १ लाख १९ हजार ५५९ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५६ हजार ४ पदव्यांचा समावेश आहे. याचबरोबर मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित स्वायत्त महाविद्यालयातील ५९ हजार ९९४ पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखेतील २७० स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) आणि २३ एमफिल पदवी प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १७ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनील भिरूड आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध प्राधिकरणातील मान्यवर आणि विविध विद्याशाखेचे स्नातक उपस्थित होते. या वेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी मुंबई विद्यापीठाने केलेल्या विकासात्मक वृत्तांताचे वाचन केले.
----
मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहेत. हवामान बदलाबरोबर, वाढते प्रदूषण आणि कमी होणारे नैसर्गिक स्रोत या परिणामामुळे जगाची ऊर्जेची मागणी भागवण्यासाठी आता वेगळा दृष्टिकोन अंगीकारावा लागणार आहे.
- प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलगुरू