
अरविंद केजरीवाल-उद्धव ठाकरे भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे हे पुढील महिन्यात मुंबईत विरोधी पक्षांच्या सभा घेण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला महत्त्व आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेची सूत्रे अधिकृतरीत्या सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग तसेच केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांची सभा घेण्यात येणार आहे. त्यासाठी इतर राज्यांमधील भाजपविरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या जात आहेत. या माध्यमातून भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
केजरीवाल आणि मान हे दोन्ही नेते शुक्रवारी मुंबईत एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांना ‘मातोश्री’वरून भेटीचे आमंत्रण आल्याचे आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले. आजची भेट आगामी काळातील रणनीतीचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.