मुंबईला दोन वर्षांत खड्डेमुक्त करू

मुंबईला दोन वर्षांत खड्डेमुक्त करू

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई शहराला शांघाय करायचे नाही, तर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनवायचे आहे. नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण केले जात आहे. येत्या दोन वर्षांत एकही खड्डा शोधून सापडणार नाही. खड्डा शोधायला बक्षीस ठेवायला लागेल, असे शहरातील रस्ते बनवण्यात येतील. येत्या दोन वर्षांत मुंबईला खड्डेमुक्त करू, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. त्यापैकी १२१ कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन, तसेच मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत एकूण ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ आणि टिळक नगर, नेहरू नगर व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. २६) चेंबूरमध्ये (पश्चिम) टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे पार पडले. या वेळी आमदार मंगेश कुडाळकर, प्रसाद लाड, खासदार राहुल शेवाळे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

मुंबईच्या सुशोभीकरणाचे काम हे या आधीच व्हायला हवे होते; मात्र ते झाले नाही. आता हे काम आम्ही करत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठलाय. ते आमच्यावर टीका करत आहेत; मात्र मुंबईच्या सुशोभीकरणाचे काम करण्यास गेली २५ वर्षे कोणी थांबवले होते, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. गेल्या अडीच वर्षांत शहराची काय परिस्थिती होती, ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे ‘मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय’ अशा प्रकारची गाणीही ऐकायला मिळत होती; मात्र आता यापुढे मुंबई बदलणार असून अशा प्रकारची गाणी ऐकायला मिळणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जनतेसाठीच पैसा खर्च करणार
काही लोक पालिकेची एफडी तोडली म्हणून आरोप करतात; मात्र हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेसाठीच खर्च व्हायला हवा. काही लोकांना मुंबईत सुरू असलेली विकासकामे बघवत नाहीत. त्यांना पोटदुखी सुरू झाली आहे. त्यांना सध्या डॉक्टरची गरज असून आम्ही त्यांच्यासाठीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून व्यवस्था केली असल्याचा चिमटा शिंदे यांनी यावेळी काढला. काही लोकांचा भोंगा सकाळी-सकाळी सुरू असतो. मात्र मुंबईतील गिरण्या बंद झाल्याने भोंग्याकडे आम्ही लक्ष देत नाही, असा चिमटाही शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता काढला.

झोपडपट्टीमुक्त मुंबईचा संकल्प
मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी धारावीसारख्या झोपडपट्टीचा कायापालट पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून करत आहोत. याशिवाय मुंबईतील धोकादायक इमारती, पोलिस वसाहत, सेस इमारती यांसह एसआरएचे थांबलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्त व दर्जेदार घर उपलब्ध होणार आहे. यामुळे बाहेर गेलेला मुंबईकर हा आता पुन्हा एकदा मुंबईत येणार आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात परदेशी गुंतवणूक वाढतेय
उद्योग बाहेर गेल्याची नुसती टीका केली जाते; मात्र यात काहीही तथ्य नाही. आम्ही दीड लाख कोटींचे करार केले आहेत. अनेक परदेशातील कंपन्या मुंबईमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी रात्रंदिवस काम करतोय. मात्र आम्ही सुरू केलेल्या प्रकल्पांमध्ये काही लोक खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक अडथळा बनू पाहत आहेत. मात्र आम्ही हे स्पीडब्रेकर काढण्याचे काम करतोय, असे ते म्हणाले.

नोव्हेंबरपासून कोस्टल रोड सेवेत
ेशहरातील ५० टक्के कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पाच हजार स्वच्छतादूतांच्या नेमणुकीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आपला दवाखान्यांची संख्या १०७ झाली आहे. १ नोव्हेंबर २०२३ पासून मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड उपलब्ध होईल, अशी ग्वाही आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com