
नवलखा यांच्या जामिनावर नव्याने सुनावणी घ्या!
मुंबई, ता. २ : भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या जामिनावर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज विशेष एनआयए न्यायालयाला दिले.
विशेष एनआयए न्यायालयाने यापूर्वी नवलखा यांना जामीन नामंजूर केला; मात्र निकालपत्रात यूएपीए कायद्याच्या कलम ४३ ड (५) नुसार सविस्तर कारणे दिलेली नाही. जी कारणे दिली आहेत, ती अनाकलनीय आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे आणि जुना जामीन नामंजूर करण्याचा निकाल रद्दबातल केला. या जामिनावर विशेष एनआयए न्यायालयाने चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, तसेच जुन्या निकालावरून निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नवलखा सध्या नजरकैदेत असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे.
नवलखा यांना ऑगस्टमध्ये २०१८ मध्ये अटक केली होती. आतापर्यंत त्यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तो नामंजूर करण्यात आला. सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यामुळे नियमित जामीन मिळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.