
अभिनेता अर्शद वारसीवर सेबीची शेअर व्यवहार बंदी
मुंबई, ता. ३ : शेअर बाजारातील एका कंपनीबद्दल व तिच्या शेअरच्या भावांबद्दल चुकीचे व्हिडीओ बनवल्याच्या आरोपांवरून अभिनेता अर्शद वारसी याच्यावर शेअर व्यवहारांना बंदी घालण्याचा आदेश बाजार नियमक सेबीने दिला आहे. मात्र त्यानंतर अर्शद वारसी याने ट्विट करून आपल्याला या शेअरबद्दल काहीही माहिती नव्हती, असे म्हटले आहे. आपणही कोणाच्यातरी सल्ल्याने त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली व इतर गुंतवणूकदारांप्रमाणे आपलीही गुंतवणूक बुडाली, असे त्याने म्हटले आहे. साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या शेअरबद्दलचे हे प्रकरण आहे. या शेअरबद्दल व त्या कंपनीबद्दल चांगली माहिती प्रसिद्ध करणारे व्हिडीओ काही लोकांनी तयार केले. त्यात अर्शद वारसीनेही काम केले होते. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचे भाव भरमसाठ वाढले. त्या व्हिडीओमुळे कित्येक सामान्य गुंतवणूकदारांनी या वाढलेल्या भावात शेअरची खरेदी केली. नंतर कंपनीचे काही प्रवर्तक, व्यवस्थापनातील काही माणसे आणि भागधारक आदी काही संबंधितांनी या वाढलेल्या भावांना शेअरची विक्री केली व भरमसाठ नफा कमवला. मात्र त्याच्या आधी या शेअरची खरेदी केलेले छोटे गुंतवणूकदार यात फसले गेले व त्यांचा मोठा तोटा झाला, असे हे प्रकरण आहे. याप्रकरणी सेबीने वारसी, त्याची पत्नी मारिया व अन्य २९ जणांवर कारवाई केली आहे. या शेअरच्या भावात अफरातफर करून किमती वाढवून नंतर त्या वाढीव भावाला विक्री केल्याच्या लोकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.