टाटा पॉवर आणि आयएसएस स्वच्छ ऊर्जा वापरासाठी करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा पॉवर आणि आयएसएस स्वच्छ ऊर्जा वापरासाठी करार
टाटा पॉवर आणि आयएसएस स्वच्छ ऊर्जा वापरासाठी करार

टाटा पॉवर आणि आयएसएस स्वच्छ ऊर्जा वापरासाठी करार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : प्रमुख उत्पादन कंपन्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणारी ‘आयएसएस इंडिया’ ही कंपनी व टाटा पॉवर यांच्यात करार झाला असून त्यानुसार ‘आयएसएस’तर्फे सेवा देत असलेल्या इतर कंपन्यांमध्ये हरित ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश रोहतगी, समूहाचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकॉब अँडरसन यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. आयएसएस कंपनीचा व्याप देशातील २३ राज्यांमध्ये पसरला असून एक हजार मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. या मोठ्या कंपन्यांना तांत्रिक, व्यावसायिक, दळणवळण, संपर्क, प्रशासकीय आदी सर्व सेवासुविधा पुरवणाऱ्या आयएसएसकडे पन्नास हजार कर्मचाऱ्यांचे पाठबळ आहे. सध्या कंपनीचा महसूल दीड हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून तीन वर्षांत तो अडीच हजार कोटींवर नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. याचदरम्यान आपला व्यवसाय, तसेच कर्मचारी संख्याही दुप्पट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. कंपनीतर्फे विविध मोठ्या कंपन्यांना तांत्रिक सेवा, इतर साह्य, कार्यालयीन सुविधा दिल्या जातात. बँका, आयटी कंपन्या, उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी यांना सेवा देऊन या क्षेत्रात आघाडी घेण्याचा निर्धार असल्याचे आकाश रोहतगी यांनी सांगितले.

--------
स्वच्छ ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न
टाटा पॉवरशी केलेल्या करारामुळे स्वच्छ ऊर्जा वापराचे देशाचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल, असे ‘आयएसएस’कडून सांगण्यात आले. सोबतच औद्योगिक आणि व्यापारी व्यवसाय, डाटा सेंटर, बांधकाम व्यवसाय इथे स्वच्छ ऊर्जा वापराचा प्रयत्न केला जाईल. कंपनीचे अंधेरी येथील मुख्यालय देखील हरित इमारतीत असून तेथेही स्वच्छ ऊर्जेचा वापर केला जातो, असेही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश रोहतगी यांनी सांगितले.