होळीच्या दिवशी त्वचेकडे करु नका दुर्लक्ष - डाॅक्टरांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीच्या दिवशी त्वचेकडे करु नका दुर्लक्ष - डाॅक्टरांचे आवाहन
होळीच्या दिवशी त्वचेकडे करु नका दुर्लक्ष - डाॅक्टरांचे आवाहन

होळीच्या दिवशी त्वचेकडे करु नका दुर्लक्ष - डाॅक्टरांचे आवाहन

sakal_logo
By

रंगपंचमीदरम्यान त्वचाही सांभाळा
ॲलर्जी-संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण. धुळवडीसाठी नैसर्गिक रंग वापरण्याचा आग्रह दरवर्षी केला जातो. तरीही काही रंगांमध्ये असणारे रासायनिक पदार्थ त्वचेला हानिकारक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी योग्य काळजी घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी होळीनिमित्त केले आहे.
हानिकारक रासायनिक रंगांमुळे त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, ॲलर्जी, संसर्ग, लालसरपणा आणि पुरळसारख्या त्वचेच्या समस्या भेडसावतात. त्यामुळे लहान मुलांसह तरुणांनीही त्वचेची काळजी घ्यावे, असे आवाहन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सौरभी देशपांडे यांनी केले आहे.

अशा प्रकारे घ्या काळजी
बर्फाचे तुकडे :
होळी खेळण्याआधी बर्फाचे तुकडे त्वचेवर फिरवणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होऊन आत रंग जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मुरुमांना प्रतिबंध करता येतो. बर्फाचे तुकडे किमान १५ मिनिटे चेहऱ्यावर चोळा.

सनस्क्रीन :
होळी घराबाहेर खेळली जाते. एखादी व्यक्ती सतत सूर्याच्या संपर्कात असते. रंग आणि पाणी त्वचेतील ओलावा कमी करू शकते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि काळवंडते. त्यासाठी सनस्क्रीन लावणे उत्तम. योग्य सनस्क्रीन निवडण्यापूर्वी तज्ज्ञांची मदत घ्या. सनस्क्रीमचे प्रमाण ‘एसपीएफ ५०’ असावे.

शरीराला न चुकता तेल लावा :
रंगपंचमी खेळताना केसांबरोबरच शरीरालाही तेल लावा. तेलामुळे रंग सहज काढण्यास मदत होते. रंग त्वचेत प्रवेश करत नाही. शिवाय तेल त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारण्यास आणि ॲलर्जी आणि मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करील. त्यासाठी नारळ किंवा बदाम यांच्यासारखे कोणतेही तेल निवडू शकता.

चांगल्या दर्जाचा लिप बाम वापरा : 
त्वचेचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे ओठ. म्हणून होळी खेळण्यापूर्वी ओठांवर आवर्जून लिप बाम लावा. नैसर्गिक लिप बाम तुमच्या ओठांना ओलावा देतात आणि हानिकारक रंगांपासून त्यांवर भेगा पडण्यापासून रोखतात. लिप बाममुळे ओठ मऊ आणि लवचिक राहतात.

पुरेसे पाणी प्या :
दिवसातून कमीत कमी दोन लिटर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेट राखणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरडेपणा आणि ब्रेकआऊट्सपासून दूर राहण्यास मदत होईल. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासही त्याचा फायदा होईल.