
‘एनएमआयएमएस’चा व्हर्जिनिया टेकशी सहकार्य
मुंबई, ता. ७ : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्यांवर एकत्रित काम करण्यासाठी एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाच्या वरिष्ठांनी नुकतीच व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ॲण्ड स्टेट युनिव्हर्सिटी अर्थात व्हर्जिनिया टेकच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी चर्चा व काही सहकार्य करार करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील संशोधन, अभ्यासक्रमाचा विकास तसेच विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप व प्लेसमेंट आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. व्हर्जिनिया टेकच्या शिष्टमंडळात कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. सिरील क्लर्क, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. डॅनियन सुई, गुरु घोष, डॉ. तरुण सेन तसेच अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हेरॉल्ड ब्रायमन आदींचा समावेश होता; तर श्री विलेपार्ले केळवणी मंडळ आणि एनएमआयएमएस तर्फे मंडळाचे सचिव अमित शेठ, सदस्य शालीन दिवाटिया, एनएमआयएमएसचे कुलगुरू रमेश भट, प्रकुलगुरू डॉ. शरद म्हैसकर, डॉ. मीना चिंतामणेणी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
दोन दिवस चालेल्या या चर्चेत दोन्ही संस्थांच्या आतापर्यंतच्या सहकार्याचा आढावा घेण्यात आला; तर जागतिक पातळीवर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सर्व शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचाही दाखला देण्यात आला. उद्योजक व शिक्षणतज्ञ यांच्यातील सहकार्याचे महत्त्व ब्रायमन यांनी सांगितले. अशा सहकार्यानेच आपण पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य यांच्यातील दरी भरून काढू शकतो. याद्वारे भविष्यातील आव्हाने पेलणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असेही हेरॉल्ड ब्रायमन यांनी सांगितले. उच्चशिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनीही आपली मते मांडली. संशोधनाबद्दलची विद्यापीठांची भूमिकाही या वेळी मांडण्यात आली व परस्परांच्या संशोधनांची माहितीही देण्यात आली. संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबतही दोन्ही विद्यापीठांच्या वरिष्ठांमध्ये चर्चा झाली.
एनएमआयएमएस व व्हर्जिनिया टेक या दोन विद्यापीठांच्या सहकार्यामुळे ज्ञानाचे आदानप्रदान, संशोधन व नवकल्पना यांना प्रोत्साहन देणारी व्यवस्था निर्माण होईल. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, त्यामुळे भविष्यातही असे सहकार्य आवश्यक आहे.
- रमेश भट, कुलगुरू, एनएमआयएमएस