एसटी महामंडळाचे मायक्रो प्लानिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी महामंडळाचे मायक्रो प्लानिंग
एसटी महामंडळाचे मायक्रो प्लानिंग

एसटी महामंडळाचे मायक्रो प्लानिंग

sakal_logo
By

एसटी महामंडळाचे मायक्रो प्लानिंग
उत्पन्न‍वाढीसाठी विविध विभागांचा आढावा; प्रगती अहवालांचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोरोना आणि संपानंतर अत्यंत डबघाईस आलेली एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महामंडळाकडून मायक्रो प्लानिंग सुरू आहे. राज्यातील प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात येणार असून ११ ते २८ मार्चदरम्यान विविध विभाग नियंत्रकांना आपल्या विभागातील प्रवासी, बसेस आणि इतरही सुविधांचा प्रगती अहवाल बैठकीत सादर करावा लागणार आहे. त्यासाठी नुकतेच नियोजन व पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकासाठी सूचना काढल्या असून, सर्वच मुद्यांचा स्वतंत्र संच तयार करून खातेप्रमुखांना बैठकीच्या ३ दिवसापूर्वी माहिती सादर करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.
सांख्यिकीय शाखेकडून विभागनिहाय महत्त्वाच्या फलनिष्पत्तीचा आढावा, यांत्रिकी मापदंडाची गेल्या वर्षीच्या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती, वाहतूक विभागाकडून विभागातील सध्या चालवण्यात येणाऱ्या लांब व मध्यम पल्ला नियतांचे भारमान व चालवलेल्या दिवसांचा तपशील, सध्या चालनातील शटल व विनावाहक फेऱ्यांचे भारमान, विभागातील शिवशाही नियतांचे भारमान, विभागनिहाय मार्गतपासणी आढावा, विभागातील प्रलंबित प्रकरणांची माहिती, विभागातील प्रलंबित अपराध प्रकरणे, प्रलंबित सार्वजनिक ऑनलाईन तक्रारी, अपघाताची माहिती मागवण्यात आली आहे. तर कर्मचारी वर्ग खात्याकडून विभागातील प्रलंबित उपदान देय प्रकरण आणि विभागातील रोस्टरच्या मंजुरीची तारीख पदनिहाय, विभागनिहाय माहितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
नियोजन व पणन विभागातील न्यायप्रविष्ट वाणिज्य आस्थापनांच्या प्रकरणांचा आढावा, आस्थापनानिहाय थकबाकी, हॉटेल- मोटेल थांब्याची माहिती व त्यातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आली आहे.

नाथजलचा आढावा
एसटीचे अधिकृत बाटलीबंद पाणी नाथजल एसटीच्या विभागातील सर्व वाणिज्य आस्थापनांमधून विक्री होते किंवा कसे व अनधिकृत संस्थेची पाणी बाटली विक्री होत असल्यास कारवाईचा तपशीलसुद्धा मागवण्यात आला आहे. त्याशिवाय स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडून बसस्थानके व बसेस स्वच्छतेचा आढावा, बांधकाम कामाची प्रगती, प्रस्तावित बांधकाम कामाचा प्रगती आढावा आणि भांडार व खरेदी विभागाचासुद्धा या वेळी आढावा घेतला जाणार आहे.

या गोष्‍टींकडे विशेष लक्ष
- गैरवर्तनाचे अनुपातानुसार शिक्षा करणे.
- उपदानाची रक्कम मंजुरी करण्यासंबंधी कायद्याचे तरतुदींचे पूर्णपणे पालन करणे.
- न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत संबंधित विभाग नियंत्रक यांनी इत्थंभुत माहिती
- प्रमुखतः सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणात विभाग नियंत्रक ठेवणे. त्‍यांनी व्यक्तिशः लक्ष घालणे.
- वकिलांचे शुल्क वेळेवर अदा करणे.
- चौकशी योग्य रीतीने हाताळणे.
- न्यायालयासमोर योग्य पुरावे देणे.
- मोटार अपघात दाव्यात घटनेचा अहवाल नेहमी एसटी चालकाच्या विरुद्ध तयार करण्याला आळा घालणे.
- मोटार अपघात दाव्यात योग्य पुरावा देणे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन
- प्रलंबित प्रथम व द्वितीय अपील प्रकरणे.
- विभागातील निलंबित कर्मचाऱ्यांची माहिती.
- मध्यवर्ती कार्यालयात अभिप्रायाकरिता प्रलंबित विधी प्रकरणे.