तुटपुंजी मानधन वाढ मान्य नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुटपुंजी मानधन वाढ मान्य नाही
तुटपुंजी मानधन वाढ मान्य नाही

तुटपुंजी मानधन वाढ मान्य नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : जोपर्यंत सरकार मानधनात भरीव वाढ करणार नाही, तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी पुन्हा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनने सरकारने दिलेल्या मानधन वाढीवर नाराजीही व्यक्त केली आहे.

किमान १५ हजार मानधन मिळाले पाहिजे, हजार-दोन हजार रुपयांच्या वाढीने काहीही होत नाही, असे सांगत या अंगणवाडी सेविकांनी येथेच बसण्याचा निर्धार केला आहे. कोविड काळातील ठाकरे सरकारनेही फक्त आश्वासन दिले होते, या सरकारने मानधन जाहीर केले, ते मान्य नसल्याचे स्पष्ट करत, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी दिला.

अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थाने अनेक मुलांच्या माता आहेत. त्यांना मानधन नाही, तर पगार मिळायला हवा, महाराष्ट्र शासनात नोकरी मिळायला हवी. अंगणवाडी सेविका बरीचशी कामे करतात. बीए, एमएड झालेल्याही सेविका आहेत, त्यांचे प्रश्न मी सभागृहात मांडणार आहे.
- मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना

दोन दिवसांपासून आंदोलनासाठी आम्ही बसलो आहोत, पण कोणीच दखल घेतली नाही. अंगणवाडी सेविकांना १५ हजार वेतन आणि मदतनिसांना १० हजार वेतन मिळाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही.
- राधा राजपूत, अंगणवाडी सेविका, औरंगाबाद

पोरं-बाळं सोडून आम्ही येथे आलोय. आजच्या बजेटमध्येही सारखीच मानधन वाढ सरकारने जाहीर केली. ही वाढ आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही येथे बसलोय. भरीव मानधनाशिवाय येथून हटणार नाही.
- प्रतिभा सौंदाणे, अंगणवाडी सेविका, हरसवाडी, औरंगाबाद

अंगणवाडी सेविकांना ही मानधनवाढ मान्य नाही. दिवसभरात १६ ते १७ कामे करावी लागतात. संपूर्ण दिवस कामात जातो. घरदार सोडून मुंबईत आलोय. त्यामुळे शासनाने आमच्या मानधनात भरीव वाढ करावी आणि वेतनश्रेणी लागू करावी. मोबाईलचे पोषण ट्रॅकर अॅप मराठीतून द्यावे.
- रेखा गवारे, अंगणवाडी सेविका, चाळीसगाव

किशोरवयीन मुलींपासून ते गर्भवती महिला, बाळ सहा वर्षांचे होईपर्यंत आम्हाला सर्व बघावे लागते. एका अंगणवाडीत २०० मुले आहेत, त्यांचा संपूर्ण अहवाल आम्हाला ठेवावा लागतो. महागाईच्या काळात एवढ्याशा पगारात काहीही होत नाही. आता ग्रॅच्युईटीही सरकारने लागू करावी.
- सरला देशमुख, अंगणवाडी सेविका, तळेगाव

निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना एक लाख रुपये एकरकमी लाभ दिला जातो, तो गेली तीन वर्षे मिळालेला नाही. पेन्शनची घोषणा केली होती, पण अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. १०० आमदारांनी सेविकांना पाठिंबा दिला, यात त्यांनी सेविकांना १५ हजार व मदतनीसला १० हजार देणार म्हणून सांगितले, त्याचीही दखल घेतली नाही.
सुधीर सोनावणे, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी असोसिएशन