
उद्या काँग्रेसचा राजभवनला घेराव
मुंबई, ता. ११ ः उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर नरेंद्र मोदी सरकारची विशेष मेहरबानी आहे. यामुळेच एसबीआय आणि एलआयसीमधील लोकांचे पैसे अदाणींच्या कंपनीत मनमानी पद्धतीने गुंतवण्यात आले. अदाणी समूहातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा पैसा सुरक्षित राहिलेला नाही. याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. १३) राजभवनाला घेराव घालण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १३) दुपारी ३.०० वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर राजभवनला घेराव घातला जाईल. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे. त्यातच जनतेचा पैसा अदाणींच्या घशात घालून त्यांनाही आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदाणीचा फुगा लवकर फुटेल अशी भिती व्यक्त केली होती; पण मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. मोदी सरकार भ्रष्ट अदाणीला पाठीशी घालत आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी तिसऱ्यांदा कारवाई करत आहे; परंतु याच ईडीला भाजपाचे भ्रष्ट नेते दिसत नाहीत. भाजप सरकार अदाणींच्या महाघोटाळ्यावर गप्प बसले असले, तरी जनतेच्या हितासाठी काँग्रेसने आवाज उठवला आहे, असे पटोले म्हणाले.