
शिक्षकांच्या संपाचे बारावीच्या परीक्षेवर सावट
मुंबई, ता. १२ : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी मंगळवारी (ता. १४) संप पुकारलेला आहे. याच दिवशी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचे अनेक विषयांचे पेपर असल्याने परीक्षेचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सध्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. त्यातच १४ मार्च रोजी दहावीचा पेपर नसला, तरी बारावीच्या परीक्षेचे तीन पेपर या दिवशी आहेत. यात सकाळी ११ वाजता द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पहिला पेपर सकाळी ११ ते १.३० या वेळेत आहे. त्यानंतर ११ ते २ या वेळात जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी, वाणिज्य गटातील इतर पेपरही यादरम्यान आहेत. दुपारच्या सत्रात तांत्रिक विषयाचे अनेक पेपर आहेत. याच दिवशी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाल्यास हे पेपर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
तोडगा निघणार?
संपाची दखल घेत सरकारने उद्या (ता. १३) कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात बोलावली आहे. ही बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याने त्यात तोडगा निघाल्यास हा संप मागे घेतला जाण्याची शक्यताही आहे; अन्यथा बारावीच्या परीक्षा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
आम्ही विद्यार्थीहिताला प्राधान्य देणार आहोत; परंतु सरकारने मागील अनेक वर्षांपासून रखडून ठेवलेल्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आमची मागणी आहे. यासाठी माजी आमदार रामनाथ मोते यांनी शेकडो वेळा सरकारला पत्रव्यवहार केला आणि विधान परिषदेत असंख्य वेळा विषय चर्चेला आणला होता.
- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना