
जामीनाची रक्कम भरण्यास नकार
मुंबई, ता. १४ : ऐन विमान प्रवासात धूम्रपान केल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा कथित आरोप असलेल्या प्रवाशाने मंजूर झालेला २५ हजार रुपयांचा जामीन नाकारल्यामुळे त्याला कारागृहात जाण्याचे आदेश अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी दिले. माझ्यावर ठेवलेल्या आरोपांसाठी केवळ २५० रुपये दंड असल्याची माहिती गुगल सर्चमध्ये दिसते. त्यामुळे मी तेवढा दंड भरेन, पण जामिनाची २५ हजार रुपयांची रक्कम जमा करणार नाही, असे आरोपीने सांगितले. एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमान प्रवासात आरोपी रमाकांत द्विवेदी याने स्वच्छतागृहात धूम्रपान केल्याचा आणि विमान कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता. या कलमासाठी २५० रुपयांचा दंड आहे. ही रक्कम भरायला मी तयार आहे; मात्र जामीन भरणार नाही, अशी भूमिका आरोपीने मांडली. त्यानंतर न्यायालयाने त्याला कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले.