
बेस्टचा ‘बस करो’ कार्यक्रम
मुंबई, ता. १५ : देशातील राज्य आणि महापालिका परिवहन उपक्रमांमधील अधिकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी बेस्ट उपक्रमाने दिल्ली परिवहन विभाग आणि असोसिएशन ऑफ स्ट्यूट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज यांच्या सहकार्याने ‘बस करो २०२३’ कार्यक्रम सादर केला. या माध्यमातून कामाचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान अंमलबजावणी आणि व्यवसाय मॉडेलसह बसचे नियोजन, संचालन आणि व्यवसाय मॉडेल बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
‘बस करो’ प्रकल्पांतर्गत विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात इलेक्ट्रिक बस नियोजन, सार्वजनिक-खासगी भागीदारी, शहरी बस सेवांमध्ये करार, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम, निरीक्षण, तिकीट आणि भाडे संकलन प्रणालींमधील नवतंत्रज्ञानाचा समावेश आहे. सार्वजनिक बससेवांना वित्तपुरवठा करण्यासाठी जोखीम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ‘बस करो’च्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित केला आहे.
शाश्वत वाहतूक धोरण आखण्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती देणे आणि देशातील सार्वजनिक बस संस्थांच्या प्रमुखांमध्ये पीअर-टू-पीअर लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विविध राज्यांतील अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रदेशांमध्ये अधिक प्रभावी आणि यशस्वी परिणामकारक बससेवा चालवण्याच्या उद्देशाने, आवश्यक पद्धती, यशोगाथा आणि आव्हाने यांचे अनुभव सामायिक करण्याची संधी मिळणार आहे.
---
देशाची शहरी लोकसंख्या २०२५ पर्यंत ५४० दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी १.३ लाख अतिरिक्त बसगाड्यांची आवश्यकता असेल. सार्वजनिक बस उपक्रमांमधील माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी ‘बस करो २०२३’ देत आहे. बेस्टमध्ये सध्या ४२६ इलेक्ट्रिक बस असून २०२३ अखेरपर्यंत ही संख्या सात हजार; तर २०२७ पर्यंत १० हजारपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट
---
सध्या सार्वजनिक बस उपक्रमामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे. २०३० पर्यंत ५० हजार ई-बस सेवेत आणण्याची अपेक्षा आहे. ‘बस करो २०२३’ यासारखे उपक्रम त्यासाठी महत्त्वाचे आहेत.
- माधव पै, सीईओ, डब्ल्यूआरआय